रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील बदलत्या राजकीय प्रवाहात शहाद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली असली तरी त्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे त्यांच्या जागेवर शहादा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी करणारे त्यांचे पुत्र राजेश पाडवी मात्र विजयी झाले आहेत.जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकारणात अनेक नाटय़मय घडामोडी घडल्या. त्यात विशेषत: भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांना शहादा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी नाकारुन त्यांच्याजागी त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी दिली होती. त्यातून पक्षावर राग व्यक्त करीत उदेसिंग पाडवी यांनी भाजप सोडली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपला शहादा मतदारसंघ सोडून नंदुरबार मतदारसंघात उमेदवारी केली. परिणामी नंदुरबारची लढत लक्षवेधी ठरली. येथे एकाच पक्षात काम करणारे दोन्ही आमदार डॉ.विजयकुमार गावीत व उदेसिंग पाडवी यांच्यात लढत रंगली. त्यात उदेसिंग पाडवी यांना मात्र मोठय़ा मताधिक्याने पराभव पत्करावा लागला.दुसरीकडे शहाद्यात उदेसिंग पाडवी यांचे पुत्र राजेश पाडवी हे मात्र भाजपकडून विजयी झाले. उमेदवारी मिळाल्यापासून पिता-पुत्रात अंतर्गत कलहाच्या चर्चा रंगत राहिल्या होत्या. मात्र अखेर राजेश पाडवी यांचा विजय झाला. त्यामुळे पिता पराभूत आणि पुत्र विजयी झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.नवापुराचा वारसाही पुत्राकडेनवापूर येथे काँग्रेसचे सुरुपसिंग नाईक हे विद्यमान आमदार होते. या वेळी मात्र त्यांचे वय झाल्याने काँग्रेसने त्यांचे पुत्र शिरीष नाईक यांना उमेदवारी दिली होती. सुरुपसिंग नाईक यांनीदेखील पुत्र शिरीष यांना विजयी करण्यासाठी पूर्ण प्रतिष्ठापणाला लावली होती. त्यात त्यांना यश आले असून आता सुरुपसिंग नाईक यांचा वारसा पुत्र शिरीष नाईक यांच्याकडे गेला आहे.
पिता पराभूत, पुत्र मात्र विजयी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 1:33 PM