लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील सोजरबार गावापासून नजीक असलेल्या एका शेतातील झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहा वर्षीय बालिकेस बिबट्याने गुरूवारी पहाटे अक्षरश: झोपडीत शिरून निद्रावस्थेत असताना उचलून नेत ठार केले तर शुक्रवारी पुन्हा काजीपूर-तलावडी शिवरात बिबट्याने गायीला फस्त केल्याची घटना घडली. या परिसरात जंगली श्वापदाच्या वाढत्या हल्ल्याच्या घटना निश्चितच चिंताजनक असून, बंदोबस्ताबाबत येथील वनविभाग केवळ थातूर मातूर पिंजरे लावण्याचा दिखावा करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.तळोदा तालुक्यातील सोजरबार येथील शिला भिमा नाईक ही सहा वर्षीय बालिका गावापसून जवळ असलेल्या शेतकºयाच्या शेतातील झोपडीत गुरूवारी झोपली होती. त्याच दरम्यान पहाटेच्या सुमारास बिबट्याला झोपडीतील कोंबड्या-बकºयांचा सुगावा लागल्यामुळे कुडाच्या भिंतींना जोरदार ठोस देत झोपडीत शिरला. या झोपडीत गाढ झोपेत असलेल्या बालिकेवर झडप घालत तेथून तिला उचलून तिच्यावर गंभीर हल्ला केला. यात बालिकेचा जागीच करून अंत झाला. तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर वडिलांनी आरडा-ओरड केली. तथापि तोपावेतो बालिकेचा मृत्यू झाला होता. येथील वनविभागाने घटनेच्या पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले असले तरी गेल्या तीन महिन्यात अस्वल, बिबट्या या जंगली श्वापदांच्या हल्लाची ही तिसरी घटना घडली आहे. यापूर्वी मोहिदा येथील शेतकºयाचा बळी गेला होता तर त्याच्या तिसºया दिवशी वेलीपाडा गावातील तीन जणांना अस्वलाने एका-पाठोपाठ लक्ष करत गंभीर जखमी केले होते.सुदैवाने त्यांनी अस्वलावर प्रतिकार केल्यामुळे आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले होते. गेल्या महिन्यातदेखील तालुक्यातील तुळाजा येथील बालिकेस बिबट्याने शेतातून उचलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्या आईच्या मत्सुदगिरीमुळे बालिका बचावली होती. गेल्या तीन महिन्या दरम्यान, माणसावरील जंगली श्वापदांच्या हल्ल्याच्या चार घटना घडूनदेखील येथील वनविभाग गंभीर व ठोस उपाय योजना करायला तयार नाही. केवळ इकडे-तिकडे पिंजरे लावण्याचा दिखाऊपणा केला जात आहे. साहजिकच नागरिकांमध्ये वनविभागाच्या कचखाऊ भूमिकेबाबत तीव्र असंतोष पसरला आहे. त्यांनी पिंजरे लावले असले तरीही श्वापदे त्यांच्या हातावर तुरी देऊन निघून जात आहे. रोजच कुठेना-कुठे बिबट्या, अस्वल नागरिकांना दिसत असतात. परंतु वनविभागाच्या नजरेस ते पडत नाही. तीन दिवसांपूर्वीदेखील मोड गावातील एका आदिवासी मजुराच्या झोपडीतील शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. तरीही वनविभाग त्यातून ठोस उपाययोजना द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात हल्ल्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत असून, ही चिंताजनक बाब आहे.या श्वापदांच्या ठोस बंदोबस्ताबाबत वनविभागाच्या वरिष्ठ प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालिकेच्या घटनेच्या पंचनामा करण्यात आला असून, आता त्या ठिकाणी पाच कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.-चंद्रकांत कासार, वनक्षेत्रपाल, वनकार्यालय, तळोदा
बिबट्याच्या हल्ल्याने सोजरबार येथे भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:16 PM