लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : जलवाहिनीचे लिकेज शोधताना शहादा शहरातील पुरातन गणपती मंदिराजवळ भले मोठे भुयार सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. भुयार पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.शहादा शहरातील नदी परिसरात यापूर्वी अनेकदा भुयारे सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. असेच एक भुयार गुरुवारी जलवाहिनीचे लिकेज शोधताना पालिका कर्मचा:यांना आढळून आले. गोमाई नदी परिसरात सोनार गल्लीत सुमारे 500 वर्षापूर्वीचे पुरातन गणपती मंदिर असून नुकतेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या मागील बाजूस ब्राrाणगल्ली परिसरात काही घरांना नळाचे पाणी येत नसल्याने पालिकेच्या कर्मचा:यांकडून जलवाहिनीचे लिकेज शोधण्याचे काम सुरू होते. त्यासाठी काँक्रिटीकरणाचा रस्ता खोदकाम करत असताना रस्त्याचा मोठा भागच खाली भुयारीत पडला. सुमारे पुरुषभर खोलीचा खड्डा रस्त्याखाली असल्याचे उघडकीस आले. रस्त्याखालील भुयार मंदिराच्या खालून सुमारे 20 ते 25 फूट लांब असल्याचे समजते. याच परिसरात जलवाहिनीचेच काम करताना सुमारे दीड-दोन महिन्यापूर्वी देखील भुयार सापडले होते. त्यानंतर पुन्हा याच परिसरात भुयार सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. मंदिर परिसरात भुयार सापडल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांनी भुयार पाहण्यासाठी गर्दी केली.सोनार गल्लीतील गणपती मंदिर शहराचे ग्रामदैवत मानले जाते. शहरातील सुमारे 500 वर्षापूर्वीचे शहरातील हे सर्वात पुरातन मंदिर असून ब्रिटिश राजवटीपासून शासन दरबारी या मंदिराची नोंद आहे. नर्मदा परिक्रमेतील हे मंदिर असून नर्मदा परिक्रमा करणारे भाविक या मंदिराला भेट देतात. मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाने नुकतेच या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना गुरुवारच्या भुयार सापडल्याच्या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे. भुयारामुळे मंदिराच्या भिंतींनाही तडे पडले आहेत. मंदिराजवळ असलेले भुयार किती लांब आहे याचा अंदाज लावता येत नाही. मात्र यामुळे मंदिर व परिसरातील घरांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने ताबडतोब भुयार बुजवावे, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. सोनारगल्ली, ब्राrाणगल्ली, भोईगल्ली, भावसार मढी, जुनी पोस्टगल्ली हा सर्व भाग गोमाई नदीला लागून आहे. या परिसरात भुयार सापडल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. त्यावर तात्पुरत्या उपाययोजना करून भुयारे बुजविण्यात आले. असे प्रकार वारंवार उघडकीस येत असल्याने पुरातत्व विभाग व भूगर्भशास्त्र विभागातर्फे या परिसराचा अभ्यास झाला पाहिजे अन्यथा एखाद्यावेळी मोठी दुर्घटना घडू शकते अशी प्रतिक्रिया सौरभ जहागिरदार यांनी दिली.
शहाद्यात भुयार आढळल्याने घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:14 PM