लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत सहाव्या व शेवटच्या दिवशी दीड हजार इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केले. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ स्लो चालत असल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. परिणामी, पाच तालुक्यांत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कक्षात तोबा गर्दी झाली होती. सोबत, तहसील कार्यालयांच्या बाहेरही जत्राच भरल्याचे दिसून आले. दरम्यान दिवसभरात अर्ज दाखल करण्यासाठी वेळोवेळी गर्दी वाढती राहिल्याने प्रशासनावरचा ताण वाढला होता. शहादा व नंदुरबार येथे रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सायंकाळी अंतिम मुदतीअखेर तळोदा तालुक्यात ७ ग्रामपंचायतीसाठी १८२, धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ४१६, नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी २०५ तर अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३५ अर्ज दाखल झाले आहेत. शहादा व नंदुरबारच्या अर्जांची मोजणी उशिरापर्यंत सुरु असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी ५७७ नामनिर्देशन दाखल झाले होते. सोमवारी १३६ जणांनी अर्ज दाखल केले होते. यातून दोन दिवसांंत ७१३ नामनिर्देशन प्रशासनाकडे आले होते. दरम्यान, सीसीएसी सेंटर आणि सायबर कॅफेवर जाऊन अर्ज भरणा-यांना अडचणी येत असल्याचे दिसून आले होते. यातून सर्व्हर स्लो झाल्याने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. यातून गर्दी होण्याचा संभव असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात होता. बुधवारी सकाळी १० वाजेपासून गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कक्षांमध्ये गोंधळ वाढला होता. सर्वच ठिकाणी अर्ज भरणा करण्यासाठी गर्दी करत असल्याने रांगा लावण्यासाठी पोलीस कर्मचा-यांची मदत घेण्यात आली.
२८३ प्रभागातून ७६५ सदस्य पदांच्या जागांसाठी दीड लाख मतदार करणार मतदान नंदुरबार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या ७० प्रभागातून एकूण ३७ हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत. यात १९ हजार ३२० पुरूष तर १८ हजार ५५३स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तापीकाठालगतची व पूर्ण भागातील काही गावे बिनविरोध हाेण्याची शक्यता आहे. शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचातींच्या ८९ प्रभागातील ४८ हजार ६०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २४ हजार ८७७ पुरूष तर २३ हजार ७२९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. उशिरापर्यंत तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणे सुरु होते. तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, सारंगखेडा, असलोद येथील निवडणूकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. नवापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या ४५ प्रभागात निवडणूक होणार आहे. यात २२ हजार ६४९ मतदार सहभागी होणार आहेत. यात १० हजार ८२९ पुरुष तर ११ हजार ९२० महिला मतदारांचा समावेश आहे. यात ढोंग, सागाळी, कोठडा, उमराण व रायंगण या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष आहे. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५३ प्रभागात निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी २५ हजार ७५२ मतदार सज्ज झाले आहेत. यात १३ हजार ९२ पुरूष तर १२ हजार ६६्० महिला मतदार आहेत. बुधवारी दिवसभरात एकूण २८८ अर्ज दाखल झाले होते. यातून आजअखेर १४ ग्रामपंचायतींसाठी ४१६ नामनिर्देशन दाखल झाले आहेत. तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या २३ प्रभागात निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत१८२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान एकूण ९ हजार ६३६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ४ हजार ६३१ पुरूष तर ५ हजार ३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील चार ग्रामपंचायती ह्या पुनवर्सन बाधितांच्या ग्रामपंचायती तेथील निवडणूक लक्ष्यवेधी ठरणार आहे. बुधवारी ९५ अर्ज येथे दाखल झाले.