लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा येथील एका दुमजली कौलारू लाकडी घराला लागलेल्या आगीत रेशन दुकानासह गुरांचा गोठा यांना लागलेल्या आगीत सागवानी लाकूड, धान्य व इतर साहित्यासह एकूण सहा लाख ६४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.नवापूर तालुक्यातील कुंभारपाडा येथे नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती व धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक रतिलाल होन्या गावीत यांच्या राहत्या घराच्या बाजूस असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान व गुरांचा गोठा तसेच वरच्या मजल्यावर चाऱ्याची साठवणूक करून ठेवण्यात आली होती. या घरास मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली होती. हे दुमजली घर लाकडी व कौलारू होते. तसेच वरच्या मजल्यावर गुरांसाठी चारा भरलेला होता. आग लागल्यामुळे चारा व घराचे लाकडे यांनी पेट घेतल्याने क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. आगीत रतिलाल गावीत यांचे रेशन दुकान, गुरांचा गोठा तसेच चारा व संसारोपयोगी साहित्य जळाले. हे घर सागवानी लाकडापासून बांधण्यात आलेले होते. त्यामुळे सागवानी लाकडाचे खांब, दरवाजे, लाकडी भांडे, लाकडी फळी, कौले तसेच साळ (भात), दादर, ज्वारी असे धान्यासह रेशन दुकानातील साहित्य या आगीने लपाट्यात घेत सर्व साहित्य जळून राख झाले. हे सर्व साहित्य व साधने मिळून सहा लाख ६४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले, असे तलाठी नरेंद्र महाले यांनी तहसीलदार नवापूर यांच्याकडे सादर केलेल्या पंचनाम्यात उल्लेख केलेला आहे. नवापूरचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी बुधवारी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले व येथील तलाठी यांना नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले.
कुंभारपाडा येथील आगीत साडेसहा लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:57 PM