नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात राहूनही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करत नंदुरबार जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाºया धावपटूच्या घराला लागलेल्या आगीत त्याच्या बक्षिसे, मेडल्स आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांची राखरांगोळी झाली़ या धावपटूची शासनाने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ धडगाव तालुक्यातील चिंचकाठी या दुर्गम भागातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया आसलमालपाडा येथील तीन घरे जळून खाक झाल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली होती. यात गोरजी पाडवी यांचे घरही बेचिराख झाले़ गोरजी पाडवी हे कामानिमित्त धडगाव येथे गेले असताना घर बंद होते़, तर त्यांचा मुलगा राष्ट्रीय धावपटू संतोष पाडवी हाही बाहेरगावी होता़ या आगीतील घरातील सर्व सामान, पैसे, धनधान्य, पाळीव जनावरे आदीसह विविध साहित्य जळून खाक झाले़ यातच संतोष याची शैक्षणिक प्रमाणपत्रे, त्याने तालुका,जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कमावलेली बक्षिसे, प्रमाणपत्रे जळून खाक झाली आहेत़ आग लागली त्यावेळी संतोष पाडवी हा पत्नी आणि आईसह तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे होता़ तर त्याच्या घरात नातलगाचा मुलगा मुक्कामी होता़ त्याने ही आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही आग विझली नाही़ दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क नसल्याने या आगीच्या घटनेची माहिती बाहेर पडू शकली नाही़ दरम्यान, आगीच्या घटनेनंतर धडगाव येथील काही सेवाभावी संस्था, राजकीय पदाधिकारी यांनी संतोष याच्या घरी भेट देत माहिती जाणून घेतली़ नुकसानीनंतर झालेल्या पंचनाम्यात काही लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आहे़ संतोष याची सध्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी सुरू आहे़ या तयारीत आगीमुळे बाधा निर्माण झाली असून, शासनाने त्याला मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़ सातत्यपूर्ण कामगिरीमुळे ‘संतोष’राज्याच्या आणि देशाच्या विविध भागात होणाºया खुल्या मॅराथॉन स्पर्धांमध्ये संतोषने आजवर सहभाग नोंदवला आहे़ यात गेल्यावर्षी ‘लोकमत’ची हाफ मॅराथॉन, नाशिक येथे झालेली नुकतीच झालेली मॅराथॉन स्पर्धा, जानेवारी २०१७ मध्ये झालेली पुणे येथील आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा, वडोदरा येथे झालेली आंतराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा, नाशिक येथे झालेली नाशिक पोलीस मॅराथॉन स्पर्धा, अहमदनगर येथील मॅराथॉन स्पर्धा यात सहभाग नोंदवत लक्ष वेधून घेतले होते़ त्याच्या पुढील स्पर्धांसाठी तो तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथील एका शेतावर तयारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
आगीमुळे धावपटूच्या कागदपत्रांची राखरांगोळी
By admin | Published: March 02, 2017 11:11 PM