लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात एक 48 वर्षीय पुरुष कोरोना संसर्गीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी रात्री 8.30 वाजता त्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयात प्राप्त झाला. संबधीत रुग्ण मालेगाव येथून 14 एप्रिल रोजी आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गुरुवार, 17 रोजी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या सहवासातील सर्वाना लागलीच विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. 48 वर्षीय पुरुष गेल्या आठवडय़ात मालेगाव येथे गेला होता. तो 14 एप्रिल रोजी नंदुरबारात परत आला. येथे आल्यावर त्याला त्रास जाणवू लागल्याने 16 एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॉबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर प्रशासनाने लागलीच त्याच्या सहवासातील नातेवाईकांना विलगीकरण कक्षात दाखल केले. शिवाय परिसरही सील करण्यात आला. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. शनिवार पासून सोमवार्पयत तीन दिवस संपुर्ण नंदुरबार शहरात पुर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद राहतील. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.
नंदुरबारात आढळला पहिला कोरोना बाधीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:53 PM