लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अहोरात्र परिश्रम घेऊन तीन एकर क्षेत्रात खोदलेला तलाव पहिल्याच पावसात तुडूंब भरल्याने कवठळ, ता.शहादा ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. गुरुवारी ग्रामस्थांनी पाणीपूजन करून आनंद सोहळा साजरा केला. या वेळी तलाव परिसरात सामूहिक वृक्षारोपणही करण्यात आले.कवठळ हे शहादा तालुक्यातील चार-पाच हजार लोकवस्तीचे गाव असून गावात गेल्या अनेक वर्षापासून पाणीटंचाई असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावात पाणीपुरवठा योजना असली तरी कूपनलिकेत पाणी नसल्याने ग्रामस्थांना शेतातून पाणी आणावे लागते. या पाश्र्वभूमीवर यंदा जलयुक्त शिवार व वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्यात लोकसहभागातून मोठय़ा प्रमाणावर कामे झाली. कवठळ ग्रामस्थांनीही त्यासाठी पुढाकार घेतला. त्याला मात्र उशिर झाला होता. असे असताना अवघ्या 15 दिवसात ग्रामस्थांनी अहोरात्र करून तब्बल तीन एकर क्षेत्रातील भव्य तलावाचे खोलीकरण केले. त्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड परिश्रम घेतले. जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पाणी फाऊंडेशनचे पदाधिकारी, भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.कांतीलाल टाटीया यांचेही सहकार्य लाभले. अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी पहिलाच जोरदार पाऊस झाला. या पावसाने गावक:यांनी खोदलेला तलाव तुडूंब भरला. सकाळी जेव्हा ग्रामस्थांनी ते पाहिले तेव्हा पूर्ण गावात याबाबत आनंदाचे वातावरण पसरले. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाणीपूजन सोहळा साजरा केला. या वेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार मनोज खैरनार, डॉ.कांतीलाल टाटीया, जि.प. सदस्य अभिजित पाटील, तसेच तलाव खोदण्यासाठी परिश्रम घेणारे संजय पूना पाटील, संजय तुकाराम पाटील, उद्धव मगन पाटील, राजेंद्र रतिलाल पाटील, दिलीप बुला पाटील, सरपंच रामदास चंद्रसिंग मुळे, विनोद जाधव चौधरी, नरेंद्र ओंकार पाटील, पुरुषोत्तम इंदास पाटील, प्रकाश सखाराम पटेल, दिलीप लक्ष्मण पाटील यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.
पहिल्याच पावसात कवठळचा गावतलाव भरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:26 PM