नंदुरबार : कापूस विक्री करून घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचे १३ लाख ९४ हजार रुपये लुटणाऱ्या पाच जणांना नंदुरबार एलसीबीने दोन दिवसातच अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, गावठी पिस्तूल, ४ काडतूस व कार असा एकूण २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपी हे धुळे तालुक्यातील आहेत.
संशयित आरोपींमध्ये उमेश आत्माराम पाटील (४२) रा. जुनवणे, ता. जि. धुळे, चैत्राम ऊर्फ झेंडू राजधर पाटील (४१), सागर ऊर्फ बंटी सुभाष पाटील (२४), दीपक ऊर्फ बबलू सुभाष पाटील (२६) तिन्ही रा. धामणगाव ता. जि. धुळे व राहुल बळीराम भोई (२५) रा. शिरुड, ता.धुळे यांचा समावेश आहे. भालेर येथील व्यापारी सुनील गंगाराम पाटील व त्यांचा भाऊ हंसराज दगाजी पाटील यांना शुक्रवारी पहाटे तालुका पोलिस ठाण्याजवळ कार आडवी लावून चौघांनी लुटले होते. कापूस विक्रीचे १३ लाख ९४ हजार रुपये जबरीने चोरून नेले होते. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ज्या व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने कापूस विक्री केला होता त्यालाच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर चार साथीदारांसोबत मिळून हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट झाले.