नंदुरबार : पाच वर्ष सूर जुळले नाही परंतु आता पक्ष आदेश असल्यामुळे निवडणुकीत एकदिलाने काम करणार असल्याचा निर्वाळा भाजपच्या जिल्हाध्यक्षा खासदार डॉ.हीना गावीत व शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे आणि आमशा पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेची युती जाहीर झाली आहे. स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षाचे नेते व पदाधिकारी एकत्र आले नव्हते. गुरुवारी दोन्ही पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोघांनी भुमिका स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील एकमेकांच्या विरोधात लढले. आता युती झाल्याने एकत्र काम करणार आहोत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मने जुळविण्यात यशस्वी झाल्याचा दावाही खासदार डॉ. गावीत यांनी केला. शिवसेनेने पालिकेत काँग्रेससोबत युती केली होती. परंतु आता शिवसेना पालिकेत भाजपसोबत राहणार असल्याचा निर्वाळा विक्रांत मोरे यांनी दिला. काँग्रेसने पालिकेत पद देवू केले तरी ते घेण्याचा प्रश्नच उरत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत उपस्थित होते.
पाच वर्ष दुरावा, आता मात्र एकदिलाने काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:24 AM