शहादा : पाटचारीचे पाणी नागरी वसाहतीत घुसत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी पाटचारी मोकळी करण्याची मागणी करीत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
शहादा शहरालगत असलेल्या शिरुड चौफुलीजवळून डी ३ ही १३ किलोमीटरची पाटचारी जाते. या पाटचारीचा २.२ किलोमीटरचा भाग शहरालगतच्या नागरी वसाहतीतून जातो. या पाटचारीवर ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यामुळे पाटचारीच्या पाण्याचा प्रवाह बंद झाल्या कारणाने पाटचारीचे सर्व पाणी पाटचारीलगतच्या नागरी वसाहतींमध्ये घुसते. शहरात गेल्या ४-५ दिवसांपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे वसाहतींमध्ये पाणी घुसल्याने ते नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या उद्भवत असल्याने त्रस्त झालेल्या श्री समर्थ नगर, छत्रपती शिवराय नगर व परिसरातील नागरिकांनी पाटबंधारे विभागास निवेदन देऊन पाटचारी मोकळी करण्याची मागणी केली आहे. ही पाटचारी मोकळी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारादेखील नागरिकांनी निवेदनात दिला आहे.
निवेदनावर प्रा. शिवाजी माळी, सुनील गिरासे, प्रवीण पाटील, दिलीप कोळी, दिलीप मराठे, गजानन ठाकूर, गणेश संगपाळ, शरद जाधव, संजय सूर्यवंशी आदींच्या सह्या आहेत.