तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहर व तालुक्यातील कार्यकारिणी पद वाटपाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी होते. मंचावर शहर अध्यक्ष योगेश मराठे, डॉ. रामराव आघाडे, डॉ. जगदीश मराठे, डॉ. लक्ष्मीकांत गिरणार, नगरसेविका अनिता परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, सुजाता क्षत्रीय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, केसरसिंग क्षत्रीय, ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कमलेश चौधरी, नितीन पाडवी, पुंडलिक राजपूत, अल्पसंख्याक माजी जिल्हाध्यक्ष आरिफ मिया जहागीरदार, मुस्लिम समाज अध्यक्ष आरिफ शेख नुरा आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार पाडवी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. येत्या पालिका निवडणुकीत तळोदा शहादा पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही. पालिकेमधील निवडून आलेले नगरसेवक माझ्या संपर्कात आहे व त्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही. इच्छुकांची यादी आपणाकडे असून, ती वेळेवर जाहीर करू व राष्ट्रवादीतर्फे तळोदा शहरासाठी निधी आणून या शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असे त्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
प्रास्ताविक शहराध्यक्ष योगेश मराठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश मराठे यांनी केले. याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष म्हणून गणेश पाडवी, शहर उपाध्यक्ष अनिल पवार, योगेश पाडवी, यामीन बागवान, सरचिटणीस महेंद्र पोटे, रवींद्र गाडे, राकेश जाणकार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांना पद नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण व शहरी भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांकडून या सर्वांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी संदीप परदेशी, कमलेश पाडवी, गोकुळ गुरव, संजय वानखेडे, विक्की क्षत्रीय, राहुल पाडवी, इम्रान शिखलीकर, नदीम बागवान, नितीन मराठे, महेंद्र पोटे, धर्मराज पवार यांसह राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
नगराध्यक्ष व नगरसेवक माझ्या संपर्कात
भारतीय जनता पार्टीचे जेवढेही नगरसेवक मी निवडून आणले आहेत व ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, त्यांनी मला शब्द दिला आहे की, एकदा विधानपरिषदेची निवडणूक झाली की, आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करू. एवढेच नव्हे, तर नगराध्यक्षदेखील माझ्या संपर्कात आहेत. त्यांनादेखील माझ्याशिवाय पर्याय नाही. या सर्वांना माझ्याकडे यावेच लागेल, असे उदेसिंग पाडवी यांनी म्हटले.