नंदुरबार : पुणे येथील हडपसर पोलीस ठाण्यात दाखल मोक्काच्या गुन्ह्यातील चार संशयिताना नंदुरबार येथे अटक करण्यात आली. ठेकेदार असल्याचा बनाव करून त्यांनी नंदुरबारातील कोकणीहील परिसरात घरभाड्याने घेतले होते. पुणे पोलीस व नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या.
विशाल शिवाजी ढोरे, रा. मांजरी ग्रीन सोसायटी, हडपसर, असलम मंजूर पठाण, रा.सांगवी, ता.अक्कलकोट, जि.सोलापूर, सचिन गुलाब धिवार, रा.महादेवनगर, मांजरी, ता. हवेली व परवेज शब्बीर जमादार, रा.सोमवारपेठ, पोलीस लाइन, पुणे असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, हडपसर पोलीस ठाणेअंतर्गत विविध कलमान्वये व मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेले संशयित फरार झाले होते. हे संशयित नंदुरबार परिसरात असल्याची माहिती पुणे गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे व पथकाने नंदुरबारचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन माहिती दिली. पंडित यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना पथकाला मदत करण्याचे सांगून संशयिताना अटक करण्याचे निर्देश दिले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी संशयितांची सर्व माहिती जाणून घेत आपल्या विभागातील अनुभवी कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. पथकाने आपल्या पद्धतीने माहिती काढली. निरीक्षक राजपूत यांना ती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताना जेरबंद करण्याचे ठरले.
संबंधित संशयित हे कोकणीहील परिसरात भाड्याच्या घरात राहत असल्याची खात्री झाली. त्यांनी बांधकाम ठेकेदार असल्याची बतावणी करून त्यांनी भाड्याने घर घेतले होते. त्यानुसार एका पोलीस कर्मचारी यास पार्सल डिलिव्हरी बॉय म्हणून पार्सल देण्यासाठी पाठविले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावला. परंतु संबंधिताना संशय आल्याने त्यांनी मागील दरवाजाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने घराला चारही बाजूने घेरलेले असल्यामुळे त्यांना पळून जाता आले नाही व त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे असलेल्या दोन आलिशान कार त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, हवालदार प्रमोद सोनवणे, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, विजय धिवरे, अभय राजपूत, आनंदा मराठे, यशोदीप ओगले यांनी केली.
संबंधित संशयित आरोपी हे गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर नंदुरबार एलसीबीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.