लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखाना साईटवर चेअरमन दीपक पाटील व कंचन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला. सातपुडा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी 14 हजार 423 एकर उसाची नोंदणी केली असून कारखान्याने या गाळप हंगामात चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असल्याची माहिती दीपक पाटील यांनी दिली.कार्यक्रमास कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, टाटा इंटरनॅशनल लि.मुंबई या कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक सत्यनारायण पात्रो, आलिया कमोडीटीज प्रा.लि. मुंबईचे संचालक अशोक पटेल, तळोदा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन गोविंद पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमसिंग अहेर, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, सूतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, दूध संघाचे चेअरमन रवींद्र रावल, कृषी विज्ञान केंद्र कोळदाचे कृष्णदास पाटील, अण्णासाहेब पतसंस्थेचे चेअरमन सुनील रोहिदास पाटील, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेशचंद्र चोरडीया, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्थेचे संस्थापक संचालक संजय पाटील, कमलताई पतसंस्थेचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील, जयप्रकाश पाटील, उद्धव रामदास पाटील, के.डी. पाटील, गणेश उत्तम पाटील, प्रदीप गिरासे, रमाकांत पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक उपस्थित होते.या वेळी दीपक पाटील म्हणाले की, सन 2019-20 या गाळप हंगामासाठी सातपुडा साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी 14 हजार 423 एकर ऊसाची नोंदणी केली आहे. कारखान्याने या गाळप हंगामात चार लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून, सुवर्ण महोत्सवी वर्षात सभासदांमध्ये स्पर्धा निर्मितीच्या हेतूने सहकार महर्षी सातपुडा मिशन 100 अंतर्गत एकरी 100 मेट्रीक टन ऊस उत्पादन पारितोषिक योजना आखण्यात आली आहे. या योजनेत जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे. तसेच या हंगामात परिसरातील नोंद व बिगर नोंद असा सर्व ऊस गाळपासाठी घेतला जाईल. त्यामुळे सर्वानी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. परिसर विकासाच्या दृष्टीने सातपुडा सुरू राहणे सर्वाच्या हिताचे आहे. कारखान्याचे संस्थापक स्व.पी.के. अण्णा पाटील यांनी अनेक अडचणींवर मात करीत सातपुडा सुरू ठेवला. आपणही सातपुडा सुरू ठेवण्यासाठी अविरत प्रय} करीत राहू, असे सांगितले. पाटील यांनी यावर्षी कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून 10 टक्के रक्कम जाहीर केली.कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, ऊस शाश्वत पीक असून, ते हमी पीक म्हणूनही घेतले जाते. उसाला एफआरपीनुसार भाव दिला जात असल्याने बहुसंख्य शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देतात. सातपुडा साखर कारखान्याने ऊस उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय खत, ड्रोनद्वारे औषध फवारणी, असे विविध प्रयोग राबविले आहेत. सभासदांनी कोणत्याही अपप्रकारास बळी न पडता आपल्या कारखान्यास ऊस पुरवठा करावा. परिसरातील नोंद व बिगर नोंद असा संपूर्ण ऊस गाळपासाठी घेण्यात येईल. या वेळी कारखान्याच्या माजी अधिका:यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक पी.आर. पाटील तर आभार ऑटोमेशन मॅनेजर मिलिंद पटेल यांनी मानले.
येत्या गाळप हंगामात चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:50 PM