लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 22 : एमबीबीएस साठी प्रवेश मिळवून देतो असे सांगून आंबेजोगाई येथील पाच जणांनी नवापूर येथील एकाची 16 लाखात फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवापूर येथील मोहम्मद आसीफ सुलेमान बदुडा यांनी आपल्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यास क्रमासाठी प्रवेश मिळावा यासाठी आंबेजोगाई येथील महादेव तुकाराम उजगरे व इतरांशी नोव्हेंबर 2016 मध्ये संपर्क साधला. त्यांनी प्रवेशासाठी 23 लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार बदुडा यांनी 23 लाख रुपये दिले देखील. परंतु मुलीचा एमबीबीएसला काही नंबर लागला नाही. बदुडा यांनी पैसे परत मागितले असता सात लाख रुपये परत दिले. उर्वरित पैसे देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. पैसे मागण्यासाठी पुन्हा पुणे येथे आल्यास गुंडाकरवी ठार मारण्याची धमकी देखील दिली. याबाबत मो.आसीफ सुलेमान बदुडा यांनी नवापूर पोलिसात फिर्याद दिल्याने महादेव तुकाराम उजगरे, मिराबाई महादेव उजगरे, सूर्यकांत तुकाराम उजगरे, श्रीकांत तुकाराम उजगरे व नंदकुमार मुकंद पोटभरे सर्व रा.प्रबुद्ध नगर, आंबेजोगाई, जि.बीड यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक भंडारे करीत आहे.दरम्यान, यापूर्वी देखील बीड येथीलच काही जणांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला होता. आता ही दुसरा प्रकार आहे.
वैद्यकीय प्रवेशाबाबत नवापूरात 16 लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:40 PM