नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदसाठी असलेल्या तीन थंब मशीन वारंवार बंद राहत असल्यामुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. मशीनवर तांत्रिक कारणामुळे गैरहजर नोंदले गेल्यास वरिष्ठाकडून नोटिसीला सामोरे जावे लागते. दररोज सकाळी सव्वानऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास व सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास थंब मशीनजवळ कर्मचाऱ्यांची गर्दी होते, रांगा लागतात. जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद ठेवण्यासाठी थंब मशीन बसविण्यात आले आहेत. तीन थंब मशीन असूनही त्यांचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. सकाळच्या वेळी नेटवर्क नसणे, बिघाड होणे या कारणांमुळे वारंवार बंद राहत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सकाळची उपस्थिती नोंद करण्यास अर्थात थंब करण्यास अडचणी येतात. काही वेळा निर्धारित वेळ निघून जाते. त्यामुळे लेटमार्क लावला जातो किंवा गैरहजर अशी नोंद केली जाते. त्यामुळे वरिष्ठांकडून आलेल्या नोटिसीला तोंड द्यावे लागते. वास्तविक कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहूनही केवळ थंब मशीनच्या तांत्रिक कारणामुळे किंवा नादुरुस्तीमुळे कर्मचाऱ्यांना लेटमार्क किंवा गैरहजर नोंदीला सामोरे जावे लागते. दररोजची ही समस्या निर्माण झाली आहे. मशीन दुरुस्त करावेत, प्रभावी इंटरनेट नेटवर्क जोडावे किंवा पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून केली जात आहे. अन्यथा आणखी मशीन वाढवाव्या अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
थंब मशीनच्या वारंवारच्या नादुरुस्तीमुळे कर्मचारी कंटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 4:33 AM