नंदुरबार शहरात सकाळी सात वाजेपासून विविध ठिकाणी मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होते. कचोरीपासून ते मूगभजीपर्यंत तसेच गुजराती फाफडा ते जिलेबीपर्यंत सर्वच पदार्थांना मोठी पसंती दिली जाते. परंतु बहुतांश ठिकाणी सकाळी कढईत टाकलेल्या तेलातच दुपारपर्यंत पदार्थ तळून घेण्याची पद्धत अवलंबली जाते.
रस्त्यावर न खाल्लेले बरे
नंदुरबार शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर तेलात तळले जाणारे पदार्थ सहज उपलब्ध होतात.
कचोरी, समोसे, पाववडा, बटाटेवडा, फाफडा, भजी हे पदार्थ खाण्यास सर्वाधिक पसंती दिली जाते.
हातगाड्यांवर तेलाचा वारंवार वापर होत असताना कढईच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते.
एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यावर पोटाच्या विकारांना सुरुवात होते. यात पित्ताचा सर्वाधिक त्रास होतो. तसेच हृदयासंबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते. घशात खवखव होण्याचे प्रमाणही वाढते. बहुतांश हाॅटेल व्यावसायिकांकडे तेलाचा वापर झाल्यानंतर ते उघड्यावर ठेवण्यात येऊन त्यात पुन्हा तळण काढले जाते.
पुनर्वापर केलेल्या तेलाचे सेवन करणे म्हणजे आजारांना आमंत्रण देणे आहे. अशा तेलामुळे हृदयरोग बळावण्याची चिन्हे असतात. शरीरिक क्षमता कमकुवत करण्याचे काम तेलकट पदार्थ करतात. सामान्यपणे नागरिकांनी तेलकट पदार्थ टाळावेत.
- डाॅ. राजेश वळवी, तज्ज्ञ
कोरोनासारख्या गंभीर आजारामुळे अन्नघटकांना महत्त्व आले आहे. नागरिकांनी योग्य त्या प्रथिनांसह कार्बोदके वाढविणारे पदार्थ अन्नात घेतले पाहिजेत. जंकफूड किंवा तेलकट पदार्थ हे आरोग्य हानिकारक आहेत. तेलाच्या वारंवार वापरातील पदार्थ धोक्याचेच.
- तृप्ती नाईक, आहार तज्ज्ञ
तीन वर्षांपूर्वी नागरिकांच्या आग्रहाखातर अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय नंदुरबार येथे सुरू करण्यात आले. या ठिकाणी धुळ्याहून दोघे अधिकारी नियुक्त केले गेले. परंतु गेल्या दीड वर्षात हे अधिकारी दिसून येत नाहीत. अन्न पदार्थांबाबत अनेक तक्रारी असल्या तरी कारवाई होत नाही. धुळे येथील सहायक आयुक्तही येथे दाैरे करीत लक्ष घालत नसल्याने जिल्ह्यात मनमानी पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री सुरू आहे.
नंदुरबार शहरासह जिल्ह्यात रस्त्यावरच्या हातगाड्या आणि काही हाॅटेल्समध्ये तेलाचा सर्रासपणे पुनर्वापर केला जातो. यातून एकावरही कारवाई झालेली नाही.
आजवर तेलाचा पुनर्वापर केल्यावर कारवाईच होत नसल्याने सर्वच ठिकाणी तेलाचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जातो.