नंदुरबार - नवापूर येथे वाहनांमध्ये भरण्यासाठी वापरण्यात येणारे तब्बल ४० घरगुती वापराचे सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यापैकी १३ भरलेले तर २७ रिकामे सिलिंडर आहेत. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा नवापूर पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, नवापूर येथील सरदार चौकात सईद उर्फ लाला फारूख काथावाला यांच्या घरात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याचा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. यामुळे अपघात होण्याची शक्यता व भीतीही व्यक्त होत होती. नवापूर पोलिसांना ही बाब समजल्यानंतर पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी त्या ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. तेथे तब्बल ४० गॅस सिलिंडर आढळून आले. त्यात २७ रिकामे तर १३ भरलेले होते. याशिवाय वाहनाच्या गॅस टाकीत भरण्यासाठीचे साहित्य होते.
मंगळवारी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. पुरवठा निरीक्षक पंकज पोपटराव खैरनार यांनी याबाबत नवापूर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून सईद उर्फ लल्ला फारूख काथावाला यांच्याविरुद्ध ज्वलनशील गॅस सिलिंडरसाठा करून विना परवानगी विक्री व साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहेत.