लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पाळलेल्या डबल लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी शहरातील १०० टक्के व्यवसाय बंद होते. बंदच्या काळात हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था येथील संकल्प ग्रुपतर्फे करण्यात आली तर मुख्य रस्त्यासह सर्व वसाहतीमध्ये शुकशुकाट असल्याने पालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत सोडियम हायड्रोक्लोराईड या औषधाची फवारणी करण्यात येऊन निर्जंतुकीकरण करण्यात आले.नंदुरबार शहरात कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने २१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला होता. व्यापाऱ्यांच्या या निर्णयाला प्रशासनानेही अनुुुकूलता दर्शविली होती. परिणामी दुसºया दिवशी शहरातील रुग्णालय, मेडिकल व दूध विक्रेते वगळता संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. विविध वसाहतींमध्ये नागरिकांनामार्फत जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वत:ला वाचविण्यासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालिका प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येत आहे.शहरात ३० पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांमध्ये विविध व्याधींचा उपचार घेण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक दाखल झाले आहेत. शहरात शंभर टक्के बंद असल्याने असे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा भोजनासाठी संकल्प ग्रुपचे कार्यकर्ते सरसावले असून त्यांच्यामार्फत शहरातील प्रत्येक रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची संख्या जाणून घेत प्रत्येकाला भोजनाचे पाकिटे दिली जात आहे. त्याचप्रमाणे अनेक वसाहतींमध्ये गरजूंना भोजनाची व्यवस्था केली जात आहे.शहरातील संपूर्ण व्यवसाय ठप्प असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन पालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत अनेक भागात सोडियम हायड्रोक्लोराईड या औषधाची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. पालिका व पोलीस प्रशासनाने केलेल्या बॅरेकेटिंगचा फायदा होत असून शहरातील गर्दी कमालीची कमी झाली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परजिल्ह्यातील शहरात आलेल्या ३४८ नागरिकांची माहिती पालिका प्रशासनाने संकलित केली असून या सर्वांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
शहादा दुसऱ्या दिवशीही पूर्ण लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 12:20 PM