लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने १४ वा वित्त आयोगाचा निधी कोरोनाच्या प्रतिबंधात्मक व इतर आरोग्य विषयक उपाययोजनांसाठी वापरण्यात यावा अशी सूचना नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना दिल्या आहेत.गावात सॅनिटायझर वाटप, धुर फवारणी, औषध फवारणी, रस्ते स्वच्छता, नाली स्वच्छता व पाणीपुरवठा उपाययोजनांसाठी पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीला लाखो रूपयांचा निधी उपलब्ध करून खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे. तरी जिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायती निधीचा योग्य उपयोग करताना दिसत नाहीत.प्रत्येक ग्रामपंचायतीकडून औषधी फवारणी तर कुठे धूर फवारणी करण्यात आलेली आहे. काही गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात मास्क वाटप करण्यात आले आहे. तसेच शासनाने दिलेल्या सूचनेनुसार १४ वा वित्त आयोगाचा निधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्याची आवश्यकता असून, शासन व प्रशासन कसोटीने संपूर्ण महाराष्टÑात प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातदेखील शासनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत कोरोना विषाणूच्या जनजागृतीसाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता १४ वा वित्त आयोगातून पंचायत समितीमार्फत निधी उपलब्ध करून खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.ग्रामपंचायतींना प्रत्येकी लाखो रूपये निधी देण्यात आला असून, त्या माध्यमातून ग्रामपंचायतींनी सॅनिटायर, मास्क वाटप करून गावात औषध फवारणी, धुरळणी, रस्ते स्वच्छता, नाली सफाई, पाणीपुरवठा यासाठी निधी खर्च करावयाची आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींकडून शासनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.
कोरोनावर उपाययोजनांसाठी १४ वा वित्त आयोगाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:44 PM