नंदुरबार : वाढत्या श्वान दंशाच्या घटना, वाढलेले साथीचे आजार यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा रंगली. स्थगित विषय पुन्हा विषय पत्रिकेवर आणल्याच्या बाबीलाही विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला.पालिकेची सर्वसाधारण सभा उपनगराध्यक्षा शोभा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी छत्रपती शिवाजी नाटय़ मंदीरात झाली. सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते. बैठकीत विषय पत्रिकेवरील नऊ विषय आणि विरोधकांनी यापूर्वीच दिलेल्या नागरी सुविधांवरील पत्रावर जोरदार चर्चा करण्यात आली. बहुमताने सर्व विषय यावेळी मंजुर करण्यात आले.शहरात सध्या मोकाट श्वानांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. अनेकजण श्वानदंशामुळे जायबंदी झाले आहेत. चौकाचौकात 50 ते 60 श्वान झुंडीने फिरत असतात. त्यामुळे रस्ते आणि चौकाने रात्री फिरणेही जिकरीचे होत आहे. आता गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आहे. अशा काळात श्वानांची दहशत राहिल्यास उत्सवांवर विरंजन येणार आहे. त्यामुळे श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी विरोधकांतर्फे प्रतोद चारुदत्त कळवणकर यांनी केली. वाढत्या श्वानांच्या संख्येला उघडय़ावरील मांस विक्री, जागोजागी निर्माण झालेला कचरा आणि अस्वच्छता हे देखील तेवढेच प्रमुख कारणे असल्याचेही त्यांनी सांगितले. पालिका श्वानांची संख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार असा प्रश्न त्यांच्यासह अनेक सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर पालिकेच्या आरोग्य अधिकारी आणि मुख्याधिका:यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. याबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही यावेळी सदस्यांनी दिला.स्वच्छतेचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून नियमित स्वच्छता केली जात नसल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे फवारणी व धुरळणी करण्याची मागणी करण्यात आली. त्यावर येत्या काळात फवारणी व धुरळणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत स्थगित विषय पुन्हा चर्चेला घेतल्याच्या कारणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काहीकाळ वादविवाद रंगला.याशिवाय विषय पत्रिकेवरील इतर विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. त्यात शहरातील विद्युत पोलवर एलईडी दिवे दुरुस्ती व देखभाल करणे कामी अभिकर्ता नियुक्त करणे व त्यासाठी येणा:या अंदाजीत खर्चास मंजुरी देण्यात आली. पालिका अ वर्ग झाल्यामुळे पालिका हद्दीतील वसुल करावयाचा करमणुक कराचे दर निश्चित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत पथविक्रेत्यांना सहाय्य या घटकान्वये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करणेकामी बाह्य यंत्रणेद्वारे सव्र्हेक्षण करणे व या कामी येणा:या अदमासे खर्चास मंजुरी देण्यात आली.महाराष्ट्र नागरी आदिवासी योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी अनुदान मागणी प्रस्ताव शासनास सादर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.महाराणा प्रताप नगरात सात लाखांच्या पाईपलाईन टाकणे कामास मंजुरी देण्यात आली. पालिका हद्दीतील मतदारांचा जनता अपघात विमा काढणे व त्याकामी येणा:या अदमासे खर्चास मंजुरी देण्यात आली. एप्रिल ते जून दरम्यानच्या जमा आणि खर्चाच्या तिमाही हिशोबास मंजुरी देण्यात आली. वाघेश्वरी कॉलनीत रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या 12 लाखाच्या कामासह सोनाईनगगरात ड्रेनेज लाईन टाकणे कामाच्या साडेसात लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह केरळातील प्रलयात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
मोकाट श्वानांवरून गाजली नंदुरबार पालिकेची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 2:52 PM