प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील गौतमेश्वर मंदिरासमोरील गोमती नदीच्या पात्रात शनिवारी नवव्या दिवशी जिल्ह्यातील काही गणेश मंडळांतर्फे गणपतीचे विसर्जन करण्यात आले. या वेळी भाविकांनी ‘गणपती बाप्पा’ला कोरोनाचे संकट दूर करा, अशी प्रार्थना केली.
या वेळी, नंदुरबार, शहादा येथील मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कोविड नियमांचे पालन करीत प्रकाशा येथे गणेश विसर्जनासाठी आले होते. याप्रसंगी सर्व गणपती नावाडींनी आपल्या ताब्यात घेऊन गोमती नदीच्या पात्रात मधोमध जाऊन गणरायाचे विसर्जन केले. याप्रसंगी दोन पोलीस, दोन होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी योग्य मार्गदर्शन करीत होते. त्यांनाही भाविकांनी सहकार्य करीत गणेश विसर्जन शांततेत व उत्साह पूर्ण वातावरणात झाले. मात्र, याठिकाणी गर्दी पाहता अधिक पाेलीस कर्मचारी हवे होते. तसेच ज्या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे, त्या ठिकाणी पोलिसांचे संरक्षण आवश्यक असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी याठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक गणेश विसर्जनासाठी येत असतात. या दिवशी गर्दी लक्षात घेता मोठ्या संख्येने पोलीस व आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे.
नवव्या दिवशी घरगुती गणेश व मंडळाचे गणपती विसर्जन करण्यात आले. या वेळी काही परिवारांनी बोटीमध्ये बसून गणेश विसर्जन केले.