लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आली असल्याच्या धास्तीपोटी यंदाच्या गणेशोत्सवावरही निर्बंधाची मालिका कायम दिसून आली. वाजंत्री, बँड, ढोल-ताशे, गुलाल, मिरवणूक या सर्वांना फाटा देत सार्वजनिक मंडळ, घरगुती गणपतीने दक्षता घेतल्याने दिलासादायक वातावरणात विसर्जन सोहळा साजरा झाला. गणेश उत्सवाची रविवारी सांगता झाली. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरया’च्या जयघोषात बाप्पाला अखेरचा निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून आलेला होता. यावेळी भाविकांनी गणरायाकडे कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करून गणपती बाप्पाला निरोप दिला.
सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरू झाले असले तरी सगळी गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. त्यातच कोरोना संसर्गाचा मोठा धोका असल्याने सण-उत्सवाच्या काळात कमालीची जागरूकता ठेवावी म्हणून शहादा तालुक्यातील महसूल व पोलीस विभागाने ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. उत्सवातील जल्लोषाचा भाग कमी झाल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला असला तरी कोरोना रुग्णांची तूर्तास आटोक्यात आलेली संख्या ही सगळ्यात मोठी दिलासा देणारी बाब आहे.
रविवारी विसर्जनाला पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन व महसूल विभाग यांनी विसर्जनाच्यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवन रक्षकांचीही नियुक्ती केली होती.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
प्रकाशा येथील बसस्थानक, केदारेश्वर मंदिर, तापी नदी पूल, तापी नदीचा घाट, केदारेश्वर मंदिर प्रवेशद्वार, गौतमेश्वर मंदिर, आदी ठिकाणी पोलीस, होमगार्ड दिसून आले. ज्या ठिकाणी गणपतीचे विसर्जन झाले होते, त्या ठिकाणी सर्वजण थांबून होते.
अनंत चतुर्दशीला सकाळी ११ वाजेपासून शहादा येथील विविध मंडळांचे पदाधिकारी गणपती विसर्जनासाठी येताना दिसले तर त्यानंतर नंदुरबारसह खेडोपाड्यांतील घरगुती गणपती व मंडळाचे गणपती विसर्जनासाठी प्रकाशा येथे आले होते. काही मंडळांनी गोमाई नदीच्या पुलावरून, तर काही मंडळांनी नावेवर बसून तापी नदीच्या मधोमध जाऊन गणपतीला अखेरचा निरोप दिला.
नावाड्यानी केले विसर्जन
नदीला पाण्याचा मोठा फुगवटा आहे. कुठली दुर्घटना घडू नये यासाठी प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी नियोजन केले होते. केदारेश्वर मंदिरावर पोलिसांना तैनात केल्यामुळे एकाही गणपतीचे विसर्जन तापी नदी घाटावर झाले नाही. गौतमेश्वर मंदिर परिसरात सर्वच मंडळांचे पदाधिकारी गणेश विसर्जनासाठी आले होते.
गोमाई नदी पुलावरील संरक्षण कठडे तुटले असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच प्रांताधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला हाताशी घेत तात्पुरत्या स्वरूपाचे बॅरिकेड्स केले होते. त्यामुळे या परिसरात कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.
चोख पोलीस बंदोबस
गौतमेश्वर मंदिरावर दिवसभर पोलीस कर्मचारी थांबून होते. त्यांनी नावेवर गणेश भक्तांना बसताना फक्त एकाच जणाला पाठवलं. बाकीच्या सर्वांना बाहेरच थांबवलं. त्यामुळे गणपती विसर्जनासाठी याठिकाणी एक शिस्त दिसून आली. यामुळे कुठे गडबड झाली नाही.
महसूल विभाग थांबून
शहादा प्रांताधिकारी व तहसीलदार यांचा मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी धर्मराज पाटील, ग्रामसेवक बाळू पाटील, ग्रामपंचायत व महसूल विभागाचे कर्मचारी गौतमेश्वर मंदिरावर थांबून होते.