कोरोनामुळे कराव्या लागणाऱ्या लॉकडाऊनने अगोदरच बहुतांश नागरिकांचे उत्पन्न कमी झाले. त्यात अनेक जण तर बेरोजगार झाले. आता त्यांच्यावर महागाईने घाला घातला आहे. यात सर्वाधिक कोंडी झाली ती शेतकऱ्यांची. त्यांच्या मालाला अल्पभाव मिळत आहे. पेट्रोलचे भाव प्रतिलिटर शंभरच्याही पुढे गेले आहेत. डिझेलचाही भाव शंभर रुपयांच्या जवळपास झाले आहे.
डिझेल आणि पेट्रोलच्या भाववाढीची जणू काय स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना काळात कमाईपेक्षा खर्च जास्त होत असल्याने नागरिकांना व्याजाने पैसे घेऊन उदरनिर्वाह करावा लागत आहे. शिवाय त्यात मोबाइल बिलाचीही भर पडली आहे. मुलांच्या ऑनलाइन शाळांसाठी मोबाइल आवश्यक झाला आहे. त्यामुळे खर्चही वाढला आहे. परिणामी केंद्र सरकारप्रती रोष व्यक्त केला जात आहे.
मजुरी २०० रुपये अन् पेट्रोल शंभरचे
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्याचा फटका बसत आहे. रोजगारासाठी आपल्या गावाहून शहरामध्ये जाणाऱ्या कामगारांना वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने नाईलाजाने मोटारसायकलने रोजगारासाठी शहर गाठावे लागत असते. परंतु पेट्रोलचे भाव अधिक असल्याने दिवसाला मजुरी २०० रुपये अन् पेट्रोल १०० रुपयांचे अशी गत झाल्याने संसाराचा गाडा कसा चालावावा? अशा भावनिक प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.
मोटारसायकलला आधी ब्राह्मणपुरीहून शहादा येऊन-जाऊन ५० रुपयांचे पेट्रोल लागायचे. परंतु सध्या पेट्रोलचे दर अधिक वाढल्याने आता शहादा येथे येऊन-जाऊन १०० रुपयांचे पेट्रोल लागत आहे. त्यामुळे मजुरी कमी अन् पेट्रोलचा खर्च जास्त यामुळे संसाराचा ताळमेळ बसत नाही.
-मनोज गिरासे, कामगार, ब्राह्मणपुरी, ता.शहादा
कोरोनामुळे रिक्षा व्यवसाय बंद होता. परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले असून रिक्षा व्यवसाय सुरू झाला आहे. परंतु रिक्षामध्ये मोजके प्रवासी बसविण्याबाबत निर्बंध असल्याने अल्प प्रवासी बसवतो. परंतु डिझेलचे भाव वाढल्याने डिझेल खर्चदेखील निघत नसल्याने गाडीचे हप्ते भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्याचबरोबर घरदेखील चालवावे लागत आहे.
-गणेश चतुर मराठे, रिक्षाचालक, ब्राह्मणपुरी, ता.शहादा