लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शारीरिक शिक्षण व शारीरिक शिक्षकांच्या विविध मागण्या त्वरीत सोडवून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी नंदुरबार जिल्हा युवा शारिरीक शिक्षण शिक्षक महासंघतर्फे करण्यात आली आहे.निवेदन खा.डॉ.हिर्ना गावीत यांना देण्यात आले. यावेळी खा.डॉ.गावीत यांनी मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री व क्रीडा मंत्र्यांशी चर्चा करुन पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन दिले. निवेदनात संचमान्यते संदभार्तील जाचक शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावेत आणि संचमान्यतेमध्ये शारीरिक शिक्षण विषयाचा समावेश करण्यात यावा. तसेच संचमान्यता निकषात बदल करण्यात यावेत. शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे भरतांना फक्त शारीरिक शिक्षण विषयाच्या पूर्ण कार्यभारांची जाचक अट रद्द करुन पूर्वी प्रमाणे म्हणजे १४ मे १९८७ च्या शासन निर्णयाप्रमाणे शारीरिक शिक्षण शिक्षकांची बायफोकल पद्धतीने भरती करण्यात यावी.शाळा तेथे शारीरिक शिक्षण शिक्षक नियुक्ती करण्यात यावी. शारीरिक शिक्षण शिक्षकांची भरतीसाठी इ.६ वी ते इ.१० वी हा विशेष स्तर निर्माण करण्यात यावा. दररोज एक तास याप्रमाणे आठवड्याला ६ तासिका देण्यात यावेत. शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या रिक्त पदावर शारीरिक शिक्षण शिक्षक यांची पद भरती करावी. खेळाचा सराव, स्पर्धा कालावधी, सह इतर खेळांशी संबंधित उपक्रमाचा समावेश शारीरिक शिक्षण विषयामधील कार्यभारामध्ये करण्यात यावा. शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा घेऊन गुण गुणपत्रिकेवर धरण्यात यावेत. खेळाडू अपघात विमा योजना लागु करण्यात यावी. राज्य क्रीडा धोरण २०१२ मधील सर्व तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देतेप्रसंगी नंदुरबार जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे प्रशांत शिंदे, अर्जुन चव्हाण, रमेश जयस्वाल, अनोष ठाकरे, दीपक गावित, तुषार सोपनर, दीपक कोळी, सुनील गुरखा, नंदू पाटील आदी उपस्थित होते.
शारीरिक शिक्षकांना सहा तासिका द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:49 PM