नंदुरबार : शहरातील मेमन कॉलनीत सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्र्याच्या गोडाऊनला आग लागून गोडावूनमधील टीव्ही, फ्रीज, कुलर, पत्रावळी, ग्लास व इतर साहित्य, सोडा बॉटल, खाद्यपदार्थ जळून राख झाली. दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेला इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू या आगीत खाक झाल्या. सुमारे दीड कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. पोलिसात रात्री उशिरापर्यंत आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.
शहरातील डोंगरगाव रस्त्यालगत श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर मेमन वसाहतीत पत्र्याचे आठ-दहा गाळ्यांचे शेड व गोडावून आहे. या गोडाऊनला सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागून रुपेश भट यांच्या मालकीचे शक्ती प्लाझामधील दिवाळीनिमित्त विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, टिव्ही, कुलर, चक्की, स्पीकर यासह बिले, चेकबुक, खरेदीचे बील आदी कागदपत्रे जळून खाक झाली. धर्मेद्र नहाटा यांच्या दुकानातील इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून नुकसान झाले.
याच ठिकाणी रियाज शेखाणी यांचा पत्रावळी, पेपर कप व प्लास्टीकचे इतर साहित्य बनविण्याचा कारखाना आहे. त्यांचे मशिनरीसह साहित्य जळाले आहे. दादाभाई इसाणी यांचे इलेक्ट्रिनिक साहित्याचे दुकान व राजू सोडावाला, अझर इसाणी यांचे गॅस भरण्यासाठी असलेले मशीन आगीत भस्म झाले आहे. पाच-सहा गोडाऊनमधील सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे साहित्य व मशिनरी जळाली आहे.