लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या व अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोचरा माता मंदिरावर महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी लंपास करण्याचे प्रकार सुरूच आहेत. १ डिसेंबर रोजी देखील रायगड येथील महिलेच्या गळ्यातून ९० हजाराची सोन्याची पोत लंपास झाल्याची घटना घडली. याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनुसार, खेडदिगर नजीक असलेल्या कोचरा माता मंदिरावर भाविकांची नेहमीच गर्दी असते. जाऊळ काढण्याचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. १ डिसेंबर रोजी देखील मंदिरात नेहमीप्रमाणे गर्दी होती. भारती रावसाहेब देशमुख, रा.रोहा, जि.रायगड या दर्शनासाठी आल्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास केली. तिची किंमत ९० हजार रुपये इतकी आहे. दर्शनानंतर महिलेच्या लक्षात ही बाब आल्यावर शोधाशोध झाली. परंतु उपयोग झाला नाही. त्यानंतर महिलेने म्हसावद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार नामदेव बिऱ्हाडे करीत आहे. दरम्यान, मंदिरावर अशा प्रकारे चोरीच्या घटना यापूर्वी देखील झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.
महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:13 PM