येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा भावाने निचांक गाठला असून २५० रूपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला आहे. दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला असून शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या वेगाने वाढते आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार पाच राज्यातील निवडणूक प्रचारात व्यस्त आहे शिवाय, राम मंदिर, आरक्षण या विषयांमुळे शेतीमाल भावाचा प्रश्न बाजूला पडला असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला असून शेतक-यांनी विकलेल्या मालावर त्वरित अनुदान जाहिर करावे व फरकाची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे तहसीलदार रोहिदास वारूळे यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाला होता. आलेला पैसा चाळ बांधण्यात खर्च झाला. आठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाने त्वरित आयात निर्यात धोरणात सुधारणा करून शेतक-यांना योग्य भाव मिळवून द्यावा आणि बाजारात नव्याने येत असलेल्या नविन लाल कांद्यालाही भाव मिळण्यासाठी उपाय योजना करावी. शासनाने दखल घेऊन कांदा उत्पादक शेतक-यांना उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरूण जाधव, योगेश सोमवंशी, बाळासाहेब गायकवाड, सुभाष सोनवणे, विठ्ठल वाळके, हरिभाऊ पवार, योगेश गायकवाड, संजय पाटील, मधुकर देशमुख, सतिश पाटील यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.शेतक-यांमध्ये नाराजीचा सूरयंदा दुष्काळी परिस्थिती असताना शेतक-यांनी ठिबक सिंचन, तुषार सिंचन करून, प्रसंगी टॅकरने पाणी विकत घेऊन कांदा जगवला. मात्र त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतक-यांमध्ये सरकार विरोधी नाराजीची भावना व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतक-यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 5:10 PM
शेतकरी संघटनेचा आरोप : विविध मागण्यांचे निवेदन
ठळक मुद्देआठ महिने कांदा साठवूनही मातीमोल भावाने कांदा विकण्याची वेळ शासनाच्या धोरणामुळे आली असल्याची चर्चा शेतकरी करत आहेत.