नंदुरबार
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून नंदुरबारमधील लढत विशेष मानली जात आहे. कारण नंदुरबार तालुक्यात शिंदे गट विरुद्ध भाजपा अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. या लढतीत आता भाजपानं शिंदे गटाला धोबीपछाड दिल्याचं सुरुवातीच्या कलांवरुन दिसून येत आहे. आतापर्यंतच्या जाहीर निकालानुसार एकूण १३ ग्रामपंचायतींवर भाजपाचं 'कमळ' फुललं आहे. तर शिंदे गटाच्या खात्यात ४ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
नंदुरबारमध्ये एकूण १४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यातील १२ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. यातील भाजपाकडे ७ तर शिंदे गटातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश होता. आता १३७ ग्रामपंचायतीसाठीची मतमोजणी सुरू आहे. सोमवारी ११ वाजेपर्यंत २० ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून त्यात ९ भाजप, ५ शिंदे गट व इतर ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. यापूर्वी बिनविरोध झालेल्या १२ ग्रामपंचायतींपैकी भाजप ७, तर शिंदे गट ४ व इतर १ असा दावा करण्यात आला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
नंदुरबार तालुक्यातील आमराई, आष्टा, बिलाडी, अजेपूर, काळंबा, जळखे या ग्रामपंचायतींवर भाजपानं विजय नोंदवला आहे. तर पाचोराबारी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय झाला आहे.