लोकमत न्यूज नेटवर्कखापर : गुजरात राज्यातून अवैध पणे गुरे वाहून नेणारा कंटेनर खापर गावाजव शेवाळी-नेत्रंग महामार्गावर पोलिसांनी पाठलाग करुन पकडल्याची घटना बुधवारी रात्री घडली. पाठलाग सुरू असल्याचे पाहून वाहनचालक वाहन सोडून फरार झाला.गुजरात राज्यातील सागबारा येथे गुजरात राज्याचे जीएसटी पथक वाहनांची तपासणी करत असताना गुरे भरलेला यूपी-२१-एएन ५३८६ पथकाची नजर चुकवत भरधाव वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. ही माहिती सागबारा पोलीसांनी तातडीने अक्कलकुवा पोलीसांना कळवली होती. त्यानुसार अक्कलकुवा पोलीस ठाण्यांतर्गत खापर औट पोस्टच्या कर्मचा-यांनी खापर शिवारात कंटेनर आल्यानंतर पाठलाग सुरू केला होता. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर चालक व क्लिनर या दोघांनी कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा करत पळ काढला होता. पोलीसांनी कंटेनर उघडून पाहिला असता त्यात ६४ कोंबून कोंबून भरलेली असल्याचे आढळून आले. यातील सहा जनावरे ही मृतावस्थेत होती. कंटेनरमध्ये ८ गायी, १२ मादी वासरु, ९ बैल व ३५ नर वासरु अशी ६४ जनावरे होती. यातील २ बैल, २ गायी व २ नर वासरांचा मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. इतर जनावरांना येथील गोशाळेत पाठवण्यात आले. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक विजय विसावे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी, पोलीस हेड काॅन्स्टेबल मोहन शिरसाठ, अंकुश गावीत, संजय सुर्यवंशी, निलेश वसावे, सतिष वळवी यांनी ही कारवाई केली. पोलीसांनी १२ लाख रूपयांचा कंटेनर व पाच लाख ५२ हजार रूपयांची गुरे असा एकूण १७ लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक अरविंद वळवी करत आहेत. फरार झालेला कंटेनर चालक व मालक यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती आली आहे.
खापर गावाजवळ कंटेनरमध्ये आढळली गुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 1:15 PM