नंदुरबार : आई ड्यूटीच्या धावपळीत गॅस बंद करण्याचे विसरून गेली, घरभर गॅसचा वास, अशाच घरात एकट्या खेळणाऱ्या साडेसहा वर्षाच्या साईश्वरीने प्रसंगावधान राखून घरातील सर्व खिडक्या, दारे उघडली, शेजाऱ्यांना बोलावले आणि अनुचित प्रसंग टाळला. जर तिने घरातील लाईट किंवा पंख्याचे बटन सुरू केले असते तर मोठा अनर्थ झाला असता. तिच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे परिसरात कौतुक होत आहे. त्याचे झाले असे, नंदुरबारातील कोकणीहिल भागातील गंगानगरमध्ये राहणाऱ्या आणि नंदुरबार पोलीस दलात असलेल्या वैशाली अशोक कांगणे या नेहमीप्रमाणे ड्यूटीच्या घाईगडबडीत स्वयंपाक करीत होत्या. ड्यूटीची वेळ झाल्याने त्यांनी घाईत अनवधानाने गॅस शेगडीचे बटन बंद केलेच नाही. ज्वाला निघत नसल्याने गॅस सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. तशाच त्या ड्युटीवर निघून गेल्या. नातेवाइकांचे श्राद्ध असल्याने आई व मोठा मुलगा गावी गेले होते. त्यामुळे साईश्वरी ही एकटीच घरात होती. आई गेल्यानंतर तिने सर्व दरवाजे बंद करून अभ्यासाला बसली. किचनपासून दुसऱ्या रूममध्ये अभ्यास करीत असतांना एक ते दीड तासांनी तिला गॅसचा वास येऊ लागला. तोपर्यंत घरभर गॅस पसरलेला होता. अशा वेळी तिने प्रसंगावधान राखून लागलीच किचनच्या आणि इतर रूमच्या खिडक्या, दरवाजे उघडले. परंतु गॅसचा वास काही जात नव्हता. आईला फोन करण्याऐवजी तिने लागलीच शेजारी धाव घेत शेजारच्या लोकांना ही बाब सांगितली. शेजारीही घराकडे धावले. त्यातील एकाने गॅसचे बटन तातडीने बंद करून सर्व गॅस घरातून बाहेर जाईल यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर वैशाली कांगने यांना फोन करून बोलावून घेतले.
साईश्वरी हिने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे गंगानगर परिसरात मोठा अनर्थ टळला. त्यामुळे नागरिकांनी सुटकेच्या नि:श्वास सोडून तिचे कौतुकही केले. साईश्वरी ही या वयातच साप पकडते. अर्थात तिला विषारी साप पकडू दिले जात नाहीत. तिचे मामा व पोलीस दलातील कर्मचारी विशाल नागरे हे १५ वर्षांपासून सर्पमित्र आहेत. त्यांच्याकडून ती साप पकडण्याचे शिकत आहे.