नंदुरबार : पाचवी ते आठवीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांना हायसे वाटले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात अवघे तीन महिने शाळेत जाण्यास मिळाले होते. यंदा तर शाळाच सुरू झाली नाही. सुरू होणार असलेल्या शाळांपैकी ५८ टक्के शाळा व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी शाळांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू असले तरी त्यांच्यातील उपस्थिती ६० टक्क्यांपेक्षा अधिक जात नसल्याचे चित्र आहे.
आठवी ते १२ वीच्या वर्गानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ४ ऑक्टोबरपासून या वर्गांची घंटा वाजणार आहे. शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांवर निर्णय सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती किती आणि कशी राहील याबाबत मात्र शिक्षण विभागदेखील साशंक आहे.
एक दिवसाआड शक्य
अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळे एका बाकावर एक विद्यार्थी बसविले तर एका वर्गाला एक दिवसाआड बोलवावे लागणार आहे. त्याशिवाय नियोजन शक्य नाही हे स्पष्ट आहे. परिणामी, शाळा सुरू झाल्या तरी आठवड्यातून तीनच दिवस शाळेत जाण्यास मिळणार आहे.
वाहतुकीच्या साधनांचा अभाव
सद्य:स्थितीत जवळपास सर्वच आगारांच्या एस.टी. बस फेऱ्या ग्रामीण भागात अगदीच कमी आहेत. शहरी भागात रिक्षातून आणि स्कूलबसमधून वाहतूक करण्यासही परवानगी नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतुकीच्या साधनांच्या अभावाला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे शाळेतील त्यांच्या उपस्थितीवरही परिणाम राहणार आहे. गेल्या वर्षीदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती.
नववी ते १२ वी उपस्थिती
सद्य:स्थितीत नववी ते १२ वीचे वर्ग सुरू असले तरी त्यातील विद्यार्थी उपस्थिती ६० टक्क्यांपेक्षा अधिक गेेलेली नाही. त्याला कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येण्यासाठी बस उपलब्ध नसणे, शहरी भागात रिक्षा उपलब्ध नसणे व इतर कारणे आहेत. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वर्गातील उपस्थितीबाबतही साशंकताच आहे.
गणवेश सक्ती नको
गेल्या वर्षी गणवेशाची सक्ती नसली तरीही अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यास भाग पाडले होते; परंतु अवघे तीन महिनेच शाळा सुरू राहिली. परिणामी, घेतलेले ड्रेस काहीही कामी आले नाहीत. यावर्षी ते ड्रेस वापरण्याजोगी नाहीत. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेशातच आले पाहिजे ही सक्ती करू नये, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
पुस्तके सर्व मिळालीच नाहीत
अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. त्यात शहरातील नामांकित शाळांचा देखील समावेश आहे. त्यातच बाजारात ती पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका विद्यार्थ्याला किमान दोन ते तीन विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन आलेल्या अभ्यासावर त्या विषयाचे किती ज्ञान तो विद्यार्थी ग्राह्य करेल याबाबत शंकाच आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तरी संबंधित विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शाळांचे कर्तव्य आहे.