विसरवाडी येथे किराणा व्यापारी रवींद्र किसनलाल अग्रवाल यांचे कुंभार गल्ली येथे बालाजी हार्डवेअरच्या बाजूला किराणा सामान ठेवण्यासाठी एक गोडाऊन आहे. या गोडाऊनमधून २५ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या मागील दरवाजा तोडून, आत घुसून ३६ हजार शंभर रुपयांचा किराणा माल व इतर वस्तू चोरून नेल्या. याबाबत रवींद्र अग्रवाल यांनी विसरवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांनी एक पथक नेमले. नितीन पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून यांनी विसरवाडी येथील कुंभार गल्ली व नवी दिल्ली भागातील संशयित सागर रामदास जगदाळे, गुरुदास झाल्या भिल व राकेश सुरेश साळुंखे यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने, जमादार दिलीप गावित, राजू कोकणी, विपुल नाईक, विश्वनाथ नाईक, विशाल गावित यांच्या पथकाने केली.
विसरवाडी पोलीस ठाण्यात रवींद्र किसनलाल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपास उपनिरीक्षक भूषण बैसाणे करीत आहेत.