लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय कोविड रुग्णालयातील असुविधा, वाढत्या तक्रारी लक्षात घेता अनेकांनी खाजगी रुग्णालयात कोविडवर उपचार घेण्यास प्राधान्य दिले आहे. त्याच अनुषंगाने कोरोनाच्या विविध पॉलिसीज् खरेदी करण्याकडे देखील सर्वसामान्यांचा कल वाढला आहे. सध्या कोरोना पॉलिसिज्ला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.कोरोनावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हा खर्च करणे सर्वसामान्यांना परवडत नाही. ज्यांचे मेडिक्लेम पॉलिसीज् आहेत त्यांना ते शक्य होते. परंतु मेडिक्लेम देखील सर्व खर्च कव्हर करू शकत नाही. असेही दिसून येत आहे. त्यामुळे मेडिक्लेमच्या विविध पॉलिसिज बाजारात आल्या आहेत. त्यात कोरोना कवच आणि कोरोना रक्षक या दोन पॉलिसी आहेत. त्यांचा कालावधी साडेतीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिने असा आहे. नियमित पॉलिसीपेक्षा ३० टक्के व्यवसाय यामुळे वाढला असल्याचेही सांगण्यात येत आहे. हा ३० टक्के व्यवसाय हा नवीन कोरोना पॉलिसीचाच असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी कोरोनावर उपचार करणारे खाजगी रुग्णालय मोजकेच होते. ते देखील मोठ्या शहरांमध्ये होते. त्यामुळे रुग्णांना जिल्हा रुग्णालयाती उपचार कक्षावरच अवलंबून राहावे लागत होते. सुरुवातील शासकीय कोविड कक्षात चांगला उपचार आणि सेवा मिळत होती. परंतु जसे रुग्ण वाढले व यंत्रणेवर ताण पडला तसा उपचार आणि सेवेचाही दर्जा खालावला. ही बाब लक्षात घेता खाजगी रुग्णालयांना परवाणगी देण्यात आली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर एकच किंवा दोनच रुग्णालय होते आता तालुकास्तरावर देखील खाजगी रुग्णालयांची भर पडली आहे. त्यामुळे खाजगी उपचार घेणारे हे पॉलिसीच्या माध्यमातून उपचाराचा खर्च करू लागले असल्याचे चित्र आहे.कोरोना पॉलिसी काढण्यासाठी सद्या मागणी वाढली आहे. इतर मेडिक्लेम मध्ये १०० टक्के खर्च कव्हर होत नाही. पण स्वतंत्र कोरोना पॉलिसीज सर्व खर्च कव्हर करत असल्याने लोकं स्वत:हून त्या काढून घेत आहेत.-पियूष शहा, विमा तज्ज्ञ.
कोरोना पॉलिसीज्कडे वाढता कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 3:51 PM