लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तृतीय वर्षाच्या परीक्षा आॅन लाईन पद्धतीने घेण्याचे ठरले आहे. त्यादृष्टीने येथील महिला महाविद्यालयात आॅनलाईन परिक्षेबाबतचे टेलिग्राम चॅनेल निर्माण करुन त्याद्वारे सूचना देत तयारी सुरु होती. त्याचाच एक भाग म्हणून सर्व विभागातील विद्यार्थिनी, पालक, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी यांची मार्गदर्शन कार्यशाळा झाली.कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यापीठ परीक्षा मुख्य समन्वयक प्रा.अधिकार बोरसे हे होते. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एस.पाटील होते. प्रा.बोरसे यांनी सद्याच्या काळात आॅनलाईन परीक्षा देताना लॉगिन कसे करावे, पासवर्ड कसा द्यावा, कॅमेरा कसा सेट करावा, परीक्षा काळात फोन येऊ नये म्हणून मोबाइल मधील सेटींग, मोक टेस्ट कशी द्यावी आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. यानंतर विद्यार्थिनीच्या शंकांचे निरसन करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.डी.एस पाटील यांनी कोविड आपत्ती काळात हा परीक्षा बदल स्वीकारणे, ही काळाची गरज आहे. म्हणून सर्व सूचना विचारात घेऊन मोक टेस्टचा सराव करावा व ही माहिती परिसरातील विद्यार्थिनी, ज्या तांत्रिक अडचणीमुळे या कार्यशाळेत सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना सांगून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार परीक्षा विभाग प्रमुख प्रा.एस.जी.साळुंके यांनी केले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थिनी व पालक वगार्तून समाधान व्यक्त होत आहे.