रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्राच्या सिमावर्ती भागात असलेल्या गुजरातमधील आदिवासींमध्ये काँग्रेसचा पगडा आजही कायम असल्याचे चित्र आहे. या विधानसभा निवडणुकीत सिमावर्ती असलेल्या तिन्ही राखीव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. या तीनपैकी गेल्यावेळी भाजपकडे असलेली एक जागाही यावेळी काँग्रेसने पुन्हा राखली आहे.महाराष्ट्र आणि गुजरातच्या सिमावर्तीभागात आदिवासी बहुल वस्ती आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा तर गुजरातमधील नर्मदा, तापी आणि डांग हे जिल्हे सिमावर्ती आहेत. या भागातील आदिवासी हे पुर्वापार काँग्रेस सोबतच राहिले आहेत. देशात मोदी लाट आल्यानंतर त्याचा परिणाम नंदुरबारसह गुजरातमधील काही भागातही जानवत आहे. मात्र हा प्रभाव आता पुन्हा कमी होत असल्याचे चित्र आहे. गुजरात विधानसभा सोबतच झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील तीन पालिका निवडणुकीत दोन पालिका काँग्रेसकडे तर एका पालिकेवर भाजपने सत्ता काबीज केली आहे. गुजरातमध्ये मात्र सिमावर्ती असलेल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला आहे. सिमेलगत असलेल्या गुजरातमधील व्यारा आणि डांग मतदारसंघात यापूर्वीही काँग्रेसचे आमदार विजयी झाले होते. आता देखील तेथे काँग्रेसने आपली जागा कायम टिकवली आहे. व्यारा मतदारसंघातून पुनाजीभाई गावीत हे 18 हजार 861 मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे अरविंद चौधरी यांचा पराभव केला. तर डांग विधानसभा मतदारसंघातून निसटत्या मतांनी का होईना काँग्रेसचे मंगल गावीत हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे विजय पटेल यांचा 768 मतांनी पराभव केला. निझर विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी भाजपचे आमदार होते. यावेळी मात्र ही जागा काँग्रेसने मिळविली आहे. सुनीलभाई गावीत हे या मतदारसंघातून दहा हजार 345 मतांनी विजयी झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकीची रणधुमाळी असतांनाही जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपचेही नेते गुजरातमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. त्यामुळे या भागातील निकालाकडेही सर्वाचे लक्ष लागून होते.
गुजरात विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा सिमावर्ती भाग काँग्रेससोबतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 8:04 PM