धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी (क्र. एमएच ०४ बीएन २९२३) वाहनातून बेडकी नाका मार्गाने नवापूरकडे गुटखा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बेडकी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता नाकाबंदी केली. संशयित वाहन दिसताच ते थांबविले. त्यात विजय विष्णू पेंढारकर, सागर अशोक रामराजे व अमित अग्रवाल (सर्व, रा. नवापूर) बसलेले होते. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यातून १ लाख ४९ हजार ७६० रुपयांचा गुटखा आढळून आला. अवैध विक्रीच्या उद्देशाने हा गुटका नवापूर शहरात आणत होते. दीड लाख रुपयांचा गुटका व ९ लाख ३२ हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोळी यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विजय पेंढारकर, सागर रामराजे व अमित अग्रवाल या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विजय व सागर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ करत आहेत.
नवापूर येथे दीड लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:24 AM