लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दर तीन वर्षांनी होणारी हमाल मापाडींचा दरवाढीचा प्रश्न येत्या १० दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिल्यानंतर बाजार समितील हमाली व तोलाईचे काम गुरुवारी दुपारनंतर सुरू करण्यात आले. सायंकाळी पुन्हा कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले. त्यामुळे शेकडो क्विंटल शेतीमाल उघड्यावर पडून आहे. दरम्यान, बाजार समिती सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतक-यांनी आपला शेतमाल विक्रीस आणू नये असे आवाहन बाजार समितीने केेले आहे.हमाल मापाडींची तोलाईच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ करण्यात येते. तीन वर्षाचा करार हा ३१ ॲाक्टोबरला संपला होता. १ नोव्हेंबरपासून नवीन दर मिळणे आवश्यक होते. परंतु विविध कारणांमुळे ते होऊ शकले नाही. या दरम्यान व्यापारी व हमाल मापाडी यांच्यात बैठकाही झाल्याचे सांगण्यात आले. परंतु निर्णय झाला नव्हता. त्यामुळे गुुरुवारी दुपारून हमाल मापाडींनी तोलाई व हमालीचे काम बंद केले होते. माल उघड्यावर पडूनतोलाई व हमालीचे काम बंद झाल्याने शेतकरी व व्यापारींचा शेतमाल बाजार समितीत उघड्यावर पडून होता. सद्या ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतीमालाचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात होती. त्यामुळे शेतकरी व व्यापारी देखील चिंतेत होते. सकाळी हमाल मापाडींनी शेतकऱ्यांचा माल भरून देण्यास तयारी दर्शवली. परंतु व्यापारींनीही आमचे नुकसान होईल त्यामुळे दोन्हींचा शेतीमाल भरून द्यावा अशी मागणी केली. अखेर दुपारनंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करून हमाल-मापाडींनी कामाला सुरूवात केल्याने शेतकरी व व्यापारी यांचा जीवात जीव आला. सायंकाळी पुन्हा कामबंद करण्यात आल्याने शेतीमाल उघड्यावर पडून होता.५ डिसेंबरपर्यंत निर्णयमाजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यात मध्यस्थी करीत ५ डिसेंबरपर्यंत या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने हमालमापाडींनी कामाला सुरुवात केली. दुपारी बाजार समिती सभागृहात रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सभापती, व्यापारी प्रतिनिधी, हमाल मापाडी प्रतिनिधी, बाजार समिती संचालक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी बाजार समितीचे सभापती दिनेश पाटील, व्यापारी प्रतिनिधी हरीश जैन, महेश जैन, हमाल मापाडी प्रतिनिधी कैलास पाटील, संतोष पाटील, बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर व संचालक मंडळ उपस्थित होते. रघुवंशी यांनी दोन्ही बाजू ऐकुण घेतला. सद्या विधानपरिषद आचारसंहिता असल्याने निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे ५ डिसेंबर रोजी बैठक घेऊन यावर तोडगा काढला जाईल असे सांगून हमाल मापाडींनी कामाला सुरुवात करावी असे आवाहन केले. काही वेळ कामकाज केल्यानंतर पुन्हा कामबंद आंदोलन झाले.
सायंकाळपर्यंत सुरू होते मोजमाप... दुपारनंतर हमाली व तोलाई सुरू झाल्यानंतर दोन दिवसांपासून उघड्यावर पडलेला शेतीमाल भरण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्या जीवात जीव आला होता. नंतर ते पुन्हा बंद करण्यात आले. सध्या ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज यामुळे उघड्यावरील शेतीमालाचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. ऐन हगांमात आता बाजार समिती चार ते पाच दिवस बंद राहणार असल्यामुळे समस्या निर्माण होणार आहे.