लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : हातचलाखी करत नोटा पाहण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपये लंपास केल्याची घटना तळोदा येथे घडली. संशयीत महिलेविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोदा येथे रवींद्र यादवसा कलाल यांच्या मालकीच्या दुकानात काल सायंकाळी सात वाजेचा सुमारास एक जोडपे खरेदीच्या बहाण्याने दुकानात आले. महिलेने दुकानातून मॅगी खरेदी केली. तर काउंटरवर उभ्या असलेल्या तिच्या सहकार्याने मॅगीचे 100 रुपये दिले. उर्वरित रक्कम दुकानदाराने परत केली. आम्ही परदेशातून असून मला दिलेल्या उर्वरित रकमेतील 50 रुपयांची नोट कोरी हवी, अशी ईच्छा त्याने व्यक्त केली. तसेच पुन्हा दुकानात प्रवेश करून उत्सूकतेने दुकानातील इतर वस्तूची पाहणी केली. यावेळी त्याने गल्ल्यात असलेल्या 500 रुपयांच्या नोटांचे बंडल पाहिले व त्याने हाताळायला मागितले. दुकानदाराने विश्वासाने नोटांचे बंडल त्यांच्या हातात दिले. त्याने हातचलाखीने 20 नोटा त्यातून लंपास केल्या. दरम्यान सोबत असलेल्या महिलेने दुकानात असलेल्या कर्मचा:याला गुंतवून ठेवले. दुकानदाराच्या सदर प्रकार लक्षात येऊ नये याकरिता दिशाभूल करण्यासाठी त्यांनी दुकानदाराकडुन भारतातील चलनात असलेली दोन हजाराची नोट पहावयास मिळेल का अशी विनंती केली. त्यांनी दुकानातून दोन हजार दिले. बदल्यात त्यांनी लंपास केलेल्या 500 च्या नोटातून चार नोटा परत केल्या. त्यांनी सीसीटीव्ही तपासणी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शसनास आले. कलाल यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोघांविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हातचलाखीने दहा हजार लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:33 PM