तळोदा : शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन मुलींना अपडाऊनसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली असली तरी या मुलींना स्वतंत्र बसेसऐवजी इतर प्रवाशांसोबत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. अर्थात यामागे पुरेशा बसेस आणि अपूर्ण कर्मचारीचे कारण सांगितले जात आहे. मात्र यावर पंचायत समिती प्रशासनाने व एस.टी. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून मुलींना स्वतंत्र बसेस पुरविण्याची पालकांची अपेक्षा आहे.मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्य शासनाने सन 2007-08 पासून संपूर्ण राज्यात मानव विकास मिशन ही योजना सुरू केली आहे. या योजनेत वेगवेगळ्या योजनेबरोबर विद्याथ्र्याना शैक्षणिक अभ्यास केंद्रे व ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी मोफत पास प्रवास ही योजनादेखील सुरू केली आहे. अक्कलकुवा बस आगाराकडूनही तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी चार बसेस सुरू केल्या आहेत. येथील बस स्थानक प्रमुखांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण तालुक्यातून न्यु हायस्कूल, शेठ के.डी. हायस्कू, नेमसुशिल विद्यालय, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमध्ये साधारण 800 पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. तळोदा-कोठार, तळोदा-तुळाजा, तळोदा-धनपूर व तळोदा-रामपूर अशा सात भागासाठी बस फे:यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या-त्या परिसरातील मुली या बस फे:यांमध्ये तळोद्यात ये-जा करीत असतात. तथापि मुलींसाठी असलेल्या या बसेसमध्ये प्रवाशांनादेखील बसविले जात असते. साहजिकच मुलींनाही प्रवाशांसोबतच प्रवास करावा लागत आहे. या बसेसमध्ये जागा नसल्यास मुलींना उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याचे विद्यार्थिनी सांगतात, अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही सातत्याने निर्माण होत असतो.वास्तविक मानव विकास मिशनच्या योजनेतून विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासात स्वतंत्र बस उपलब्ध करून त्यात फक्त मुलींनाच बसविण्याचे स्पष्ट नियमात म्हटले असतांना अक्कलकुवा बस प्रशासन सर्रास इतर प्रवाशांची वाहतूक त्या बसेसमध्ये करीत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनही दखल घ्यायला तयार नसल्याने बस प्रशासनाचेही फावले आहे. साहजिक हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. या दोन्ही यंत्रणांच्या मासिक सभेत विद्यार्थिनींच्या बस फे:यांबाबत संबंधीतांकडून आढावा घेणे अपेक्षित असतांना केवळ औपचारिकताच पार पाडली जात असते. त्यामुळे अजूनही अक्कलकुवा बस प्रशासन विद्यार्थिनींना स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यास तयार नसल्याचे दिसून येते. अपूर्ण बसेसची संख्या व पुरेशा कर्मचा:यांअभावी स्वतंत्र बसेस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे या यंत्रणेचे म्हणणे असले तरी त्यासाठी वरिष्ठ पातळीवर ठोस पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा याप्रकारणी संबंधीत प्रशासनास जाब विचारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मुलींच्या सुरक्षिततेबाबत कायम प्रश्नचिन्ह निर्माण होईल. निदान याबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तरीदखल घेण्याची पालकांची मागणी आहे.
मानव विकासच्या बसअभावी विद्यार्थिनींचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:23 PM