जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, शहादा ते उभादगड ही बसफेरीच बंद असल्याने आम्ही शाळेत जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.
राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्यामुळे शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. बसेस बंद असल्यामुळे नववी ते बारावीचे विद्यार्थी दुचाकी वाहनाने किंवा अवैध प्रवासी वाहनाने शहादा येथे महाविद्यालयात जात होते. मात्र, आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने सगळ्यांकडेच दोन दुचाकी वाहन असेल असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहादा ते उभादगड ही बसफेरी बंद असल्यामुळे शाळेत जाता येणार नाहीये. जयनगर, धांद्रे, लोंढरे, निंभोरे, कहाटूळ येथील पाचवी ते आठवीच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी शहादा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर लोंढरे, धांद्रे बुद्रूक, निंभोरे, उभादगड, धांद्रे खुर्द येथील विद्यार्थी जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात प्रवेशित आहेत. त्यांनाही बस नसल्यामुळे शाळेत जाता येणार नाही. शाळा चालू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे शहादा - उभादगड बसफेरी अजून चालू झाली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून सध्या तरी वंचितच राहावे लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहादा ते उभादगड ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केली आहे.
शाळा चालू होत असल्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला असला तरी शाळेत जायला बस नसल्यामुळे शाळा उघडूनही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. म्हणून शहादा ते उभादगड ही बस पूर्ववत चालू करावी.
- सुहास धनराज माळी, जयनगर, ता. शहादा, विद्यार्थी
कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने थोडे दिवस मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, बंद झालेली मंदिरे दुसरी लाट चालू झाल्यापासून शासनाने उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. आता मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी जयनगर येथे येण्यासाठी शहाद्याहून बसफेरी नसल्यामुळे श्री हेरंब गणेश देवस्थानात भाविकांना दर्शनास येण्यास अडचणीचे ठरणार आहे.
- हिरालाल माळी, अध्यक्ष, हेरंब गणेश देवस्थान ट्रस्ट, जयनगर