लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : हतनूर धरणातून १५ जुलै रोजी रात्री पाणी सोडल्याने हे पाणी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रकाशा बॅरेजमध्ये पोहोचले. मात्र प्रकाशा बॅरेजने आधीच पाणीसाठा कमी केल्यामुळे या पाण्याच्या धोका टळला असून येणारे पाणी सर्व वाहून जात आहे.सविस्तर वृत्त असे की, १५ जुलै रोजी रात्री हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. हे पाणी गुरुवारी सुलवाडे, सारंखेडा व प्रकाशा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता पोहोचण्यास सुरुवात झाली. हे पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. म्हणून प्रकाशा बॅरेजने आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे येणारे सर्वच पाणी जसेच्या तसे पुढे वाहून जात आहे, अशी माहिती सहायक अभियंता वरूण जाधव यांनी दिली. यापूर्वीच महसूल विभाग, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. यामध्ये नदीकाठी राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा संदेश दिला होता. तसेच जनावरे गुरे यांना नदीकाठावर घेऊन जाऊ नये, अशी सूचना दिली होती. त्यामुळे गुरुवारी येथील तापी नदीकाठावर शांतता दिसून आली. प्रकाशा बॅरेज प्रशासनाने आधीच सतर्क राहून दोन दिवस आधी पाच गेट उघडल्याने शिल्लक पाणीसाठा आधीच वाहून गेला. त्यामुळे येणाºया पाण्यावर नियंत्रण झाले आहे. हे पाणी पुढे पाठविल्यामुळे धोका टाळला आहे. आताच्या स्थितीला सुलवाडे बॅरेजचे आठ गेट दोन मीटरने उघडले आहेत. सारंगखेडा बॅरेजचेही १० गेट पूर्ण उघडले आहेत. म्हणून प्रकाशा बॅरेजनेही आठ गेट पूर्ण तर सहा गेट एक मीटरने उघडले आहेत. त्यामुळे आलेला पाणीसाठा आता धोक्याचा राहिला नाही, अशी माहिती अभियंता जाधव व सी.आर. यादव यांनी दिली.
हतनूरचे पाणी प्रकाशात पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 1:05 PM