नंदुरबार: उसनवारीचे पैसे घेण्यासाठी घरी बोलावून चाैघांनी एकास लाकडी दांडके तसेच हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गडदानी, ता. नवापूर येथे घडली. याबाबत विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनुसार, गडदानी येथील नितेन सावजी गावित व वेच्या आन्या गावित यांच्यात उसनवारीच्या पैशांवरून वाद होता. वादाचे पर्यवसान नंतर मारहाणीत झाले. यात एकजण जखमी झाला.
नितेन गावित यास वेच्या व इतरांनी पैसे घेण्यासाठी घरी बोलाविले. तेथे त्यांच्यात वादविवाद झाला. त्यानंतर तेथे आधीच असलेल्या इतर तिघांनीदेखील या वादात भाग घेत मारहाणीस सुरुवात केली. चौघांनी लाकडी दांडका, लोखंडी पंचने व काठीने जबर मारहाण केली. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत नितेन सावजी गावित यांनी फिर्याद दिल्याने वेच्या आन्या गावित (३०), इब्राहिम वेच्या गावित (२८), जायका आन्या गावित (२६) व रामा जायका गावित (३२, सर्व रा. गडदानी, ता. नवापूर) यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार नरेंद्र वळवी करीत आहेत.