शिबिराचे उद्घाटन डॉ. शिरीष शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. या वेळी ॲड. गोविंद पाटील, डॉ. शिरीष शिंदे, डॉ. कल्पेश चव्हाण, डॉ. वंदना सोनोने आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक स्मृतिभ्रंश दिनाचे औचित्य साधून हे शिबिर घेण्यात आले. या वेळी डॉ. शिंदे म्हणाले की, आयुष्यातील सर्व कर्तव्ये पार पाडल्यानंतर विसाव्याच्या क्षणी जर त्रास दिला जात असेल तर वडीलधाऱ्या मंडळींनी एकत्रित राहून संघर्ष करावा. आजार वाढण्याआधीच ज्येष्ठ मंडळींनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून अवयवांची तपासणी करून घेतली पाहिजे. कुठल्याही आजाराची सुरुवात असते तेव्हा ते लक्षात आले तर तो आजार बळावण्याआधी त्याचा उपचार होऊन दुर्घटना टाळता येऊ शकते, असे ते म्हणाले. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. वंदना सोनोने म्हणाल्या की, वाढत्या वयाबरोबर स्मृतिभ्रंश या आजाराची शक्यताही वाढते. पण, अशा आजाराचे वेळीच निदान व योग्य उपचार करणे आवश्यक आहे. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालयात वृद्धांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मेमरी क्लिनिक तसेच सर्व प्रकारच्या मानसिक, भावनिक व वर्तणुकीय समस्यांवर समुपदेशन केले जात असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राहुल पवार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या मोफत सल्ला आणि मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाइनविषयी माहिती दिली.
शिबिरात मानसोपचार, अस्थिरोग, कान-नाक-घसा, मधुमेह व रक्तदाब, नेत्र चिकित्सा आणि दंत चिकित्सा विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ९५ रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमास जनार्थ संस्थेच्या कार्यकर्त्या निशा तांबे आणि वंदना सामुद्रे, पोलीस सुविधाकर्ता अधिकारी रमेश हरी खवळे, मयूर भास्कर पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बारकू पाटील, सूत्रसंचालन आत्माराम इंदवे तर आभार मधुकर साबळे यांनी मानले. शिबिरासाठी ओ.डी. गिसये, डी.के. साळुंखे, एन.एस. चौधरी, एन.डी. माळी, यू.व्ही. नेरकर, राजेंद्र लांबोळे, पी.आर. जोशी, पी.टी. पाटील, प्रदीप पाटील, डी.डी. चौधरी आदींनी परिश्रम घेतले.