नंदुरबार : तालुक्यातील पूर्व भागात गुरुवारी मध्यरात्री वादळासह मुसळधार पाऊस झाला. यात केळी,पपई, ऊस व टोमॅटो यांचे प्रचंड नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वीच झालेल्या पावसात देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे होत नाही तोच पुन्हा अवकाळी पावसाने दाणादाण उडविली.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील काकडदा, हिंगणी, तोरखेडा, कोंढावळ या भागात गुरुवारी मध्यरात्री अचानक वातावरणात बदल झाला. प्रचंड वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक तास पाऊस सुरू होता. यामुळे शेतांमध्ये तलावाचे स्वरूप आले होते. या भागात शेतकरी टोमॅटोचे ही पीक घेतात. पावसामुळे टोमॅटो मातीमोल झाले आहेत. दरम्यान, पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसात जिल्ह्यात दोन हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.