धडगाव : सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या वादळी पावसात धडगाव तालुक्यात ज्वारी व मक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या नुकसानीची जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांनी पाहणी केली असून, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार कृषी व महसूल विभागाने पाहणी करीत पंचनामेही केले. त्यात ३७८ शेतकरी बाधित झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक व सौम्य स्वरुपाचा पाऊस राहिला. त्यामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना हा हंगाम तारेल, असा अंदाज होता, परंतु काहीअंशी हा अंदाज खोटा ठरला. सप्टेंबरच्या सुरुवातीला तालुक्यात ठिकठिकाणी वादळी पाऊस झाला. या पावसाचा हातधुई, टेंबला या गावांसह मांडवी व गोरंबा या भागात सर्वाधिक प्रभाव दिसून आला. त्यात ज्वारी व मका या दोन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर अन्य पिकेदेखील काही प्रमाणात प्रभावित झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रतन पाडवी यांनी पाहणी केली असून, नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानुसार या नुकसानीचे तालुका कृषी व महसूल विभागामार्फत पाहणी करीत पंचनामेदेखील करण्यात आले. त्यातून एकूण ३७८ शेतकऱ्यांचे ११८. ६५ हेक्टरवरील पिके नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
आठ लाखांची मागणी
तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्यानंतर तालुका कृषी विभागामार्फत प्रतिहेक्टरी सहा हजार ८०० प्रमाणे आठ लाख सहा हजार ८२० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीअंशी आधार मिळण्याची शक्यता आहे.
धडगाव तालुक्यातील किरकोळ शेती वगळता सर्वाधिक शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने खरीप हंगामच करता येतो आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो, परंतु काही वेळा उद्भवणाऱ्या लहरी पावसामुळे या शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवते. यातून सावरण्यासाठी त्यांना मदतीची नितांत आवश्यकता भासते. त्यावर यंदाही शासनामार्फत तालुक्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देत आधार द्यावा. - रतन पाडवी, समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद नंदुरबार
बाधित पीक क्षेत्र
१) बाजरी २.१५ हेक्टर
२) भात १.३५ हेक्टर
३) ज्वारी ४१.५५ हेक्टर
४) मका ७०.७५ हेक्टर
५) युग/उडीद २.८५ हेक्टर
एकूण ११८. ६५