यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. मात्र जून महिन्यात एक पाऊस वगळता पाऊस कुठेही न झाल्याने हवामान खात्याचा अंदाज खोटा ठरतो की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला होता. मात्र जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात सलग दुसऱ्यांदा सात दिवसांच्या अंतरात जयनगरसह परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते ते टळले आहे. गेल्या रविवारी पहाटे जयनगरसह परिसरातील सर्वच गावांमध्ये दमदार पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा रासायनिक खतांची मात्रा पिकांना दिली होती. आता पाऊस येता झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीही कापूस, पपई, केळी, मका यासारख्या पिकांना रासायनिक खते दिली होती. नंतर दोन दिवस पाऊस न आल्याने या शेतकऱ्यांचा जीव मुठीत आला होता. मात्र गुरुवारी रात्री जयनगरसह परिसरात ११ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपल्या पिकांना रासायनिक खते दिली नव्हती ते शेतकरी आपल्या पिकांना रासायनिक खते देताना दिसून आली. कोरोना महामारीमुळे ग्रामीण भागात अनेक लोकांना रोजगारास मुकावे लागले होते. मात्र आता सगळीकडे पाऊस होत असल्याने मजुरांनाही शेतामध्ये रोजगार मिळू लागला आहे.
गुरुवारी रात्री झालेला हा पाऊस संजयनगरसह परिसरातील वडाळी, बामखेडा, कुकावल, कळंबू, सारंगखेडा गावांमध्येही चांगल्या प्रमाणात झाला. जुलै महिन्यात दोन दिवस झालेल्या या दमदार पावसामुळे मजुरांनाही रासायनिक खते लावण्याची तसेच निंदणीची कामे मिळत असल्यामुळे मजुरांमध्येही रोजगार मिळत असल्यामुळे समाधानाचे वातावरण दिसून येत आहे. मागील दीड वर्षापासून शेतकऱ्यांसहीत मजूर वर्गाचीही खूप हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. आता पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांसमवेत मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.