लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस भरतीबाबत मोठी आशा लावून बसलेल्या इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने भरतीचा आदेश तात्पुरता स्थगित केला आहे. आता कधी ही भरती होईल याकडे युवकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, काही युवक वयोमर्यादा निघून जाण्याची स्थिती असून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस दलात भरती होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यादृष्टीने अनेक युवकांनी तयारी सुरू केली होती. अभ्यास आणि शाररिक कसरत याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने भरती संदर्भात आदेश देखील काढला होता. परंतु तो लागलीच रद्द करण्यात आला. त्यामुळे तयारी केलेल्या युवकांचा हिरमोड झाला आहे. शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी अशी अपेक्षा या युवकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, युवकांनी आपली तयारी सुरूच ठेवली असून भरती होईल अशी अपेक्षा आहे.
सहा हजार लोकांमागे एक पोलीसजिल्ह्यात पोलीस दलातील कर्मचारी संख्या १५०० पर्यंत आहे. तर जिल्ह्यातील एकुण लोकसंख्या ही १६ लाखापेक्षा अधीक आहे. याचा विचार करता साधारणत: सहा हजार लोकांमागे एक पोलीस कर्मचारी असल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्ह्यात पोलीस ठाणे आणि पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पोलीस भरती प्रलंबित असून अहोरात्र मेहनत उमेदवार घेत आहेत. परंतु शासनाकडून भरतीची निश्चित तारीख व पदे भरत भरले जात नाहीत. प्रत्येक वर्षी फक्त आश्वासन मिळत असल्याने पोलीस भरती करणारे उमेदवार निरा होताना दिसत आहे. ते संभ्रमात आहेत म्हनून शासनाने योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर मेगा भरती काढावी. - विक्की साळवे, नंदुरबार.
राज्यसरकार पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यावरून उमेदवारामध्ये सभ्रम निर्माण करत आहे. पोलीस भरती बाबत प्रक्रीया बाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, शासनाने आधिक वेळ उमेदवारांना आशेवर न ठेवता पोलीस भरती जाहीर करून प्रकिया राबवावी, जेणे करून भरती करणाऱ्या तरूणामध्ये उत्साह वाढेल. -अमोल शेवाळे, नंदुरबार.
पोलीस भरती करणारे उमेदवार दिवसभर अभ्यास करून सांयकाळी मैदाणी सराव करत आहे. मात्र सरकार आश्वासन देत असून भरती प्रकिया बाबत निर्णय घेत नसल्याने फक्त आशेवर ठेवले आहे. त्यामुळे एक वर्षानी वय बाद होणाऱ्या उमेदवारांचे नुकसान होणार आहे. शासनाने दिलासादायक निर्णय घ्यावा. -रवींद्र चव्हाण, नंदुरबार.