लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार आगारांपैकी केवळ नंदुरबार आगारातील हिरकणी कक्ष बंदच आहेत. नंदुरबार आगाराने देखील गेल्या काही दिवसांपासून या कक्षाची धूळ झटकली आहे. दरम्यान, हिरकणी कक्षाबाबत अनेक महिलांना माहितीच नसल्याची बाब देखील समोर आली आहे. बसस्थानकात स्तनदा मातांना बाळाला दूध पाजण्यासाठी स्वतंत्र कक्ष अर्थात हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. सुरुवातीला मोठा गाजावाजा करून हा कक्ष सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला काही प्रमाणात त्या ठिकाणी स्तनदा मातांसाठी सोयीही बऱ्यापैकी करण्यात आल्या होत्या. नंतर मात्र या कक्षाकडे दुर्लक्ष झाले. जिल्ह्यातील चारही आगाराच्या स्थानकांवर ही स्थिती झाली. नियमित स्वच्छता न करणे, आवश्यक त्या सुविधा न देणे, पंखा किंवा विजेच्या दिव्याची सोय न करणे यासह इतर बाबी वारंवार घडू लागल्या. त्यामुळे महिलांनीही त्याकडे पाठ फिरवली. सोमवारी दुपारी नंदुरबार बसस्थानकातील हिरकणी कक्षाची पहाणी केली असता ते उघडे होते. परंतु त्या ठिकाणी कुणीही नव्हते. केवळ एक व्हिलचेअर ठेवण्यात आलेली होती. शहादा, नवापूर व अक्कलकुवा स्थानकातील हिरकणी कक्ष तर बंदच होते. केवळ त्या ठिकाणी फलक लावलेला होता. अनेक महिलांना अशा प्रकारचा कक्ष असतो याची माहितीच नसल्याची बाब देखील काही महिलांशी चर्चा केली असता यावेळी समोर आली.
महिलांना माहितीच नाही... नंदुरबार व शहादा येथील बसस्थानकातील अनेक महिलांना हिरकणी कक्षाबाबत विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगण्यात आले. हा कक्ष कशासाठी असतो याचीही माहिती या महिला प्रवाशांना नव्हती. शहादा येथील काही महिलांनी मात्र बाळाला दूध पाजण्यासाठी या कक्षात बसता येते अशी माहिती दिली. परंतु ते कधी सुरू असते याची माहिती त्यांना नव्हती.
नेहमीच बंदच असतो कक्ष...शहादा, नवापूर, अक्कलकुवा आगारातील हिरकणी कक्ष नेहमीच बंद असतो. नंदुरबार आगारातील कक्ष देखील बंद राहत होता. परंतु गेल्या महिनाभरापासून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. परंतु नियमित स्वच्छता राहत नसल्यामुळे महिला त्या ठिकाणी जात नसल्याची स्थिती आहे.
नंदुरबार स्थानकातील कक्ष सुरू केला कोरोना काळात हिरकणी कक्ष बंद होता. परंतु आता आगार व स्थानक नियमित सुरू झाल्याने कक्षही नियमित सुरू असतो. वेळोवेळी स्वच्छता केली जाते. महिलांमध्ये कक्षाबाबत जागृती झाली तर प्रतिसाद वाढेल. -मनोज पवार,नंदुरबार बसस्थानक प्रमुख.