लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुड्यातील धडगाव शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरचा अक्काराणीचा महाल शासकीय अनास्थेचा बळी ठरत आहे. गेल्या अनेक वर्षात ५०० वर्षांपेक्षा अधिकचा वैभवशाली इतिहास सांगणारा हा किल्ला दिवसेंदिवस जीर्ण होत आहे. यातून इतिहासाच्या पाऊलखुणा मिटत असतानाही कोणत्याही विभागाकडे त्याकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे चित्र आहे. महाराणा प्रताप यांच्या भगिनी अक्काराणी यांच्या वास्तव्याचे दाखले देण्यात येणा-या अक्राणी महालाची निर्मिती १७ शतकात काठीचे संस्थानिक राणा गुमानसिंग यांनी हा किल्ला बांधला असल्याचे मत इतिहासकारांचे आहे. तसेच राजस्थानातील १७ व्या शतकात आश्रयास आलेल्या राजपूत योद्ध्यांनी हा किल्ला बांधला असल्याचा दावा ब्रिटीश इतिहासकारांनी केला आहे. अनेकविध दावे आणि प्रतीदावे असले तरीही राजस्थानी बनावट असलेला हा किल्ला बांधकांचा अजोड असा नमुना आहे. सातपुड्याच्या डोंगरांमध्ये संपूर्ण वीटांनी केलेले बांधकाम लक्षवेधी आणि प्रगत अशा विचारांचे आहे. तीन दिशेला भिंती आणि भक्कम अशा तटबंदी यातून शत्रूची बांधाबंदिस्ती करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून येते. पुरातन बारव आणि दगडात कोरलेले एक मंदीरही येथे आहे.
१६३४ मध्ये शहाजहानने अक्राणी महाल हे संस्थान म्हणून घोषित केल्याची नोंद धुळे गॅझेटमध्ये आहे. महाराणा प्रतापांची बहिण अक्काराणी यांचे येथे वास्तव्य राहिल्याचे दाखले दिले जातात. यामुळे या परिसराला अक्राणी असे नाव पडले. या परिसरात इतिहासाच्या खाणाखुणा नाणी इतर स्वरूपात सापडत आहेत. येथील राणी काजल माता अनेक राजस्थान व महाराष्ट्रातील राजपूत समाजबांधवांची कुलदैवत असल्याचे सांगण्यात येते.
संपूर्ण विटांचे बांधकाम असलेल्या या महालाच्या भिंती दिवसेंदिवस अधिक जीर्ण होत आहेत. किल्ल्याचे संवर्धन न झाल्यास लवकरच या भिंती नष्ट होणार आहेत. पर्यटक म्हणून येणारे सोबतचा कचराही येथेच टाकत असल्याने वास्तू खराब होत आहे. प्रशासनाने लक्ष दिल्यास हा ऐतिहासिक ठेवा जपला जाणार आहे. सातपुड्याच्या डोंगराळ भागात असलेल्या अक्राणी महालाचा पुरातत्त्व विभागाला विसर पडला आहे. येथे आजवर कोणत्याच अधिका-याने भेट दिलेली नसल्याची माहिती समाेर आली आहे.
या किल्ल्याचे पुरातत्त्व विभागाने जतन करणे आवश्यक आहे. किल्ल्याची माहिती देणारे फलक येथे लावण्याची गरज आहे. किल्ल्यात समाधी आहेत त्यांचे संवर्धन होण्याची गरज आहे. प्रविण पावरा, गडप्रेमी, रोषमाळ बुद्रुक ता. धडगाव